भंडारदरा 87, तर निळवंडे 83 टक्के भरले

अकोले – भंडारदरा धरण 87 टक्के तर निळवंडे धरण 83 टक्के भरल्याने भंडारदरा धरणातून 4739 तर निळवंडे धरणातून 5367 क्युसेकने पाण्याचा विसर्ग प्रवरा नदी पात्रात सोडण्यात आला आहे प्रवरा नदी दुथडी भरून वाहत असून, प्रशासनाच्या वतीने प्रवरा काठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने धरणात आवक सुरू असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. आज 12 तासात भंडारदरा धरणात 229 द.ल.घ.फु तर निळवंडे धरणात 230 द.ल.घ.फु नवीन पाण्याची आवक झाली.
भंडारदरा धरणात 9519 साठा होऊन धरण 87 टक्के भरले आहे तर निळवंडे धरणात 6872 द.ल.घ.फु साठा होऊन धरण 83 टक्के भरले आहे. भंडारदरा धरणातून विद्युत गृहातून 832, अम्ब्रेला फॉल 327, सांडव्यातून 3580 असे एकूण 4739 क्युसेकने पाणी सोडण्यात आले.
निळवंडे धरणातून सांडव्यातून 4567, विद्युतगृहात 800 असे एकूण 5367 क्युसेकने पाण्याचा विसर्ग प्रवरा नदी पात्रात सोडण्यात आले आहे. प्रवरा नदी दुधडी भरून वाहत आहे. धरणात पाण्याची आवक सुरू असल्याने अधिकचे पाणी सोडण्यात येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाचे वतीने प्रवरा नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. गावागावातील तलाठी व ग्रामसेवकांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे.अपाण्याची आवक वाढल्यास अथवा कमी झाल्यास विसर्ग कमी-जास्त होऊ शकतो, असे शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी सांगितले.





