फुटबॉल आयकॉन बायचुंग भुटियाचा राजकारणाला रामराम

गंगटोक : भारतीय फुटबॉलचा आयकॉन बायचुंग भुटिया याने दशकभराने राजकारणाला रामराम ठोकला. राजकीय गोल करण्यात अपयशी ठरल्याने बायचुंगने राजकीय मैदान सोडले. सिक्कीममध्ये नुकतीच विधानसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीत सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटचा (एसडीएफ) उपाध्यक्ष असणाऱ्या ४८ वर्षीय बायचुंगला पराभव पत्करावा लागला. तो त्याचा निवडणुकांमधील सहावा पराभव ठरला. त्यामुळे राजकारणातून संन्यास घेत असल्याचे त्याने जाहीर केले. निवडणुकीचे राजकारण माझ्यासाठी नसल्याची जाणीव मला ताज्या निकालामुळे झाली.
सिक्कीम आणि देशाच्या जनतेसाठी काहीतरी चांगले करण्याच्या उद्देशातून मी राजकारणात सक्रिय झालो. सिक्कीममधील क्रीडा क्षेत्र आणि पर्यटनाच्या विकासासाठी माझ्याकडे चांगल्या कल्पना होत्या. संधी मिळाली असती तर त्या कल्पना अंमलात आणणे मला आवडले असते. दुर्दैवाने, तसे घडले नाही, अशी खंत बायचुंगने व्यक्त केली.
भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार असणाऱ्या बायचुंगने २०१४ मध्ये राजकीय मैदानात उडी घेतली. त्यावर्षी तृणमूल कॉंग्रेसने त्याला पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. मात्र, त्याला अपयशाला सामोरे जावे लागले. तृणमूलने नंतर त्याला विधानसभा निवडणुकीचे तिकीट दिले. पण, त्या निवडणुकीतही तो पराभूत झाला. त्यानंतर २०१८ मध्ये तो गृहराज्यातील (सिक्कीम) राजकारणात सक्रिय झाला. त्याने हमरो सिक्कीम पक्षाची स्थापना केली. स्वत:च्या पक्षाचा उमेदवार म्हणूनही तो प्रभाव पाडू शकला नाही. मागील वर्षी त्याने स्वत:चा पक्ष एसडीएफमध्ये विलीन केला.





