Bhagwant Mann: पंजाबमधील दोन लष्करी छावण्यांजवळ झालेल्या बॉम्बस्फोटांवरून आता राजकारण पेटले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी अमृतसरमधील खासा कॅम्पजवळ झालेल्या स्फोटासंदर्भात भारतीय जनता पक्षावर (BJP) गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्याचे गंभीर आरोप मुख्यमंत्री भगवंत मान यांनी यासंदर्भात बोलताना, “ज्या राज्यात त्यांना निवडणूक लढवायची आहे, तिथे आधी दंगली भडकवणे, छोटे स्फोट घडवणे आणि धर्म व जातीच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडणे, ही भाजपची कार्यपद्धती आहे. ही भाजपची निवडणुकीची तयारी आहे.” असे गंभीर आरोप केले आहेत. त्यासोबतच “कायदा आणि सुव्यवस्था राखली जाईल आणि दोषींना कठोर शिक्षा केली जाईल”, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. “मला भाजपला सांगायचे आहे की पंजाबने खूप वाईट दिवस पाहिले आहेत; पंजाबी आता हे सहन करणार नाहीत.” ही भाजपची पंजाब विधानसभा निवडणुकीची तयारी आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. लोकांना घाबरवून मते मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. असे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. Bhagwant Mann: दरम्यान, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते आणि पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते प्रताप सिंह बाजवा यांनी राज्य सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘एक्स’ या सोशल मीडिया साईटवर बाजवा यांनी लिहिले की, एकाच दिवसात झालेले दोन सलग स्फोट—पहिला जालंधरमध्ये आणि नंतर अमृतसरमध्ये—याकडे केवळ योगायोग म्हणून दुर्लक्ष करता येणार नाही. “प्रशासनाचे मौन किंवा हलगर्जीपणा अस्वीकार्य “ काँग्रेस नेत्याने लिहिले की, पंजाब सरकारने या घटनांसाठी जबाबदार असलेल्यांना ओळखून त्यांना लवकरात लवकर न्यायाच्या कक्षेत आणले पाहिजे. अशा वेळी जेव्हा षडयंत्राचे सिद्धांत पसरत आहेत आणि जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे, तेव्हा प्रशासनाचे मौन किंवा हलगर्जीपणा पूर्णपणे अस्वीकार्य आहे. त्यांनी लिहिले की, पंजाब आधीच युवकांमधील बेरोजगारी आणि संधींचा अभाव यांसारख्या गंभीर आव्हानांशी झुंजत आहे. शांतता आणि स्थैर्य बिघडवण्याच्या कोणत्याही प्रयत्नामुळे लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना अधिकच वाढेल. अस्थिरतेचा आणखी एक काळ सहन करण्याची पंजाबची स्थिती नाही. कायदा व सुव्यवस्था राखणे आणि जनतेचा विश्वास पुन्हा मिळवणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे.