Pune District : रांजणगावात भाद्रपद गणेशोत्सवास प्रारंभ
Pune District : आगामी पाच दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमांची मेजवानी भाविकांना मिळणार आहे.

रांजणगाव गणपती :अष्टविनायकांपैकी एक महत्त्वाचे पीठ असलेल्या श्रीक्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात यंदाचा भाद्रपद गणेशोत्सव शनिवार (दि.१२) पासून भक्तिमय, उत्साही आणि मांगल्यपूर्ण वातावरणात सुरू झाला आहे. श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित हा उत्सव १२ ते १७ सप्टेंबर या कालावधीत भव्य स्वरूपात साजरा केला जात आहे. आगामी पाच दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमांची मेजवानी भाविकांना मिळणार आहे.
यंदाच्या गणेशोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे देवस्थान ट्रस्टने (दि.१२) ते (दि.१४) सप्टेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत मुक्तद्वार दर्शन व्यवस्था लागू केली आहे. विशेष व्यवस्थेमुळे दरवर्षी दर्शनासाठी दूरवरून येणाऱ्या लाखो भाविकांना प्रत्यक्ष गाभाऱ्यात जाऊन श्री महागणपतीच्या पवित्र मूर्तीला स्पर्श करून दर्शन घेण्याची व चरणस्पर्श करून आशीर्वाद घेण्याची पर्वणी उपलब्ध झाली आहे. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती.
पहिल्या दिवशी, शनिवारी सकाळी १० वाजता श्रींच्या पालखीचे पूर्वद्वार (करडे-मांजरी-दोनलाई) देवी यात्रेसाठी अत्यंत थाटामाटात व टाळ-मृदंगाच्या गजरात प्रस्थान झाले. दिवसभरात मंदिरात विशेष अभिषेक, महापूजा, मंत्रोपचार असे विविध धार्मिक विधी पार पडले. उत्सव कालावधीत दररोज रात्री ८ वाजता श्री मोरया गोसावी गणेश सांप्रदायाच्या पारंपरिक पद्धतीने महाआरती होणार आहे.
उत्सवाच्या शुभारंभप्रसंगी श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त ओमकार देव, अध्यक्षा स्वातीताई पाचुंदकर पाटील, उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव तुषार पाचुंदकर, खजिनदार विजय देव उपस्थित होते. माजी पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर, माजी विश्वस्त बबनराव कुटे, भारतीय किसान कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष श्रीकांत पाचुंदकर पाटील, प्रा. माणिकराव खेडकर, सोसायटीचे माजी चेअरमन महेश फंड, आत्माराम खेडकर, माजी उपसरपंच रघुनाथ फंड, देविदास बत्ते, विलास बत्ते, नानासाहेब लांडे, प्रताप फंड, नागरिक, महिला मंडळ व गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देवस्थानकडून नियोजन
उत्सव काळात होणारी संभाव्य गर्दी विचारात घेऊन देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख नियोजन केले आहे. दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शनबारीची रचना करण्यात आली आहे. मूलभूत सुविधांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, मोबाइल टॉयलेट्स, परिसर स्वच्छतेसाठी विशेष कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकासाठी अन्नछत्राद्वारे महाप्रसादाची अखंड व्यवस्था करण्यात आली आहे.
पोलिसांकडून विशेष आराखडा
पुणे-अहमदनगर महामार्गावर गणेशोत्सवामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष आराखडा तयार केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले आणि पोलीस अधीक्षक कुमार कदम यांच्या थेट मार्गदर्शनाखाली ३ पोलीस निरीक्षक, १२ सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, १२५ पोलीस कर्मचाऱी यांचा मोठा ताफा मंदिर परिसर व मुख्य रस्त्यांवर तैनात करण्यात आला आहे.





