अतिशय निर्लज्ज… रणवीर अलाहबादियाच्या वादग्रस्त वक्तव्याने ‘वातावरण तापता’च भाडिपाने रद्द केला ॲडल्ट्स ओनली शो

Bhadipa Show: ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शो मधील कथित अश्लील आणि वादग्रस्त विधानामुळे युट्यूब रणवीर अलाहबादिया वादात सापडला आहे. या प्रकरणात 5 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आली असून, हा शो युट्यूबवरून देखील हटवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर भाडिपा या यूट्यूब चॅनेलनेही त्यांचा ‘अतिशय निर्लज्ज कांदेपोहे’ हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या लोकप्रियतेनंतर भाडिपाकडून मराठीतही अशाच प्रकारचा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. मात्र, हे दोन्ही कार्यक्रम कथित अश्लील विधानामुळे वादात अडकले आहेत. त्यातच आता भाडिपाकडून काही दिवसांसाठी ‘अतिशय निर्लज्ज कांदेपोहे’ कार्यक्रमच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत भाडिपाने सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. हा कार्यक्रम 14 फेब्रुवारीला होणार होता.
भाडिपाने सोशल मीडियावर माहिती देत लिहिले की, भाडिपाच्या फॅन्सना कळवण्यात वाईट वाटत आहे की, सध्या ‘वातावरण तापल्यामुळे’ 14 फेब्रुवारी रोजी होणारा अतिशय निर्लज्ज- कांदेपोहेचा शो आम्ही पुढे ढकलत आहोत. तसंही व्हॅलेंटाईन डेला प्रेमापेक्षा जास्त द्वेषच मिळतो. पण आमचं आमच्या फॅन्सवर प्रेमच आहे. आमच्या टॅलेन्टला आणि प्रेक्षकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे.
View this post on Instagram
‘तिकिटांची रक्कम आगामी 15 दिवसांत तुमच्या बँक खात्यांवर जमा होईल. रिफंडच्या पैशांतून स्वत:साठी काहीतरी छान गिफ्ट घ्या. आम्हाला माहिती आहे की आमच्या फॅन्सचंही आमच्यावर खूप प्रेम आहे आणि आमच्या स्टाईलची कॉमेडी तुम्हाला आवडते. म्हणूनच आमचा एक्स्क्लुझीव्ह कॉन्टेंट बघण्यासाठी खास यूट्यूब मेंबरशीप चालू केली आहे. आम्ही अतिशय निर्लज्ज कांदोपोहेचे सर्व व्हिडीओज 18 पेक्षा जास्त वय असणाऱ्यांसाठीच पाहायला उपलब्ध करून दिले आहेत. तुम्ही तुमच्या कुटुंबासह आमच्या चॅनेलचा कॉन्टेंट पाहू शकता, असेही भाडिपाने म्हटले आहे.
विशेष म्हणजे अतिशय निर्लज्जपणे आमचा हा सभ्य शो लवकरच घेऊन येऊ. आमच्याकडून आम्ही पूर्ण प्रयत्न केला. पण तुमचा यंदाचाही व्हॅलेंटाईन डे घरीच बसून जाणार, असे भाडिपाने म्हटलंय.





