वडगाव मावळ, (प्रतिनिधी) – मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर प्रमुख राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मतदारसंघातील विविध गावागावांत फोन करून ‘तुमच्याकडे काय चाललं..?’ अशी विचारणा करून विजयाचे गणित बांधण्यात व्यस्त झाले आहेत. मावळ मतदारसंघात गत वेळीपेक्षा मतांचा टक्का घसरला आहे. त्यामुळे घटलेल्या मतदानाचा कोणत्या उमेदवाराला फटका बसणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. मावळ लोकसभा मतदारसंघ पुणे-मुंबई शहराला जोडणारा आहे. पुणे आणि रायगड जिल्ह्यांत वाड्या-वस्त्यांत हा मतदार संघ विस्तारला आहे. मतदार संघ मोठा विस्तारला असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार प्रत्येक गावापर्यंत पोहोचू शकले नाहीत. परिणामी, उमेदवारांची कार्यकर्त्याच्या बळावर निवडणुकीची भिस्त अवलंबून होती. गत निवडणुकीच्या तुलनेत मतांचा टक्का घसरला आहे. गेल्यावेळी ५९ टक्के मतदान झाले होते. तर यावेळी ५४.८७ टक्के मतदान झाले आहे. यामुळे घसरलेल्या मतदानाच्या टक्केवारीचा महायुतीला की महाविकास आघाडीला फटका बसणार आहे, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. महाविकास आघाडीर्फे संजोग वाघेरे पाटील, तर महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यात प्रमुख लढत होणार असून या दुरंगी लढतीत कोण बाजी मारणार, याबाबत एसटी प्रवास, सार्वजनिक कट्टे याठिकाणी विजयाची गणिते मांडली जात आहेत. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर समाज माध्यमांवर विविध गावांतील कार्यकर्ते उमेदवाराला किती मतदान होईल, याचा अंदाज बांधत असल्याची स्थिती आहे. मतदारसंघात आपले नातेवाईक, मित्र परिवाराला फोन करून कोणत्या पक्षाला किती मतदान होईल, याचा अंदाज घेत आहेत. मावळमध्ये काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गावपातळीवर पक्षाच्या ध्येय धोरणाच्या विरोधात भूमिका घेतल्याचे दिसून आले. याला काही प्रमाणात नात्यागोत्यांची किनार असल्याचे समजते. मावळ तालुक्याच्या काही भागात महायुती किंवा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हातचे राखून काम केले. आपल्या पक्षाचा उमेदवार नसल्याने ही मरगळ होती, असे गावपारावर बसलेले कार्यकर्ते सांगत होते. घटलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार? घटलेल्या मताचा टक्का कोणत्या उमेदवाराच्या पथ्यावर पडणार, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहेत. दरम्यान, राजकीय पक्षाचे गावपुढारी आपल्याच उमेदवाराला अधिक मताधिक्य मिळेल, असा दावा करत आहेत. या निवडणुकीत प्रथमच गावपातळीवर पैशांचा मोठा वापर झाल्याची चर्चा आहे. ही पद्धत घातक असल्याचे राजकीय जाणकारांमधून बोलले जात आहे. संपली इलेक्शन, जपा रिलेशन गाव किंवा शहरी भागात सोशल मिडियावरून राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा जोरदार प्रचार सुरू होता. एखाद्याने आपल्या पक्षाची बाजू मांडली की ती खोडून काढण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्धी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून होत होता. कधी कधी तर टोकाची आक्रमक भूमिका राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मांडताना दिसत होते. मात्र सोमवारी सांयकाळी सहा वाजता निवडणूक संपुष्टात आल्यावर याच कार्यकर्त्यांनी ’संपली इलेक्शन, जपा रिलेशन’ अशा आशयांच्या पोष्ट सोशल मिडियावर टाकल्या.