देशाला अन्नसुरक्षा देणाऱ्या शेतकऱ्यांचा विश्वासघात – राहुल गांधी

नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी नव्या कृषी कायद्यांवरून मोदी सरकारवर पुन्हा निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांनी देशाला अन्नसुरक्षा दिली. मात्र, मोदी सरकारने शेतकऱ्यांचा केवळ विश्वासघात केला. यापुढे तसे चालणार नाही, असे त्यांनी म्हटले.
नव्या कृषी कायद्यांना शेतकऱ्यांकडून आणि विशेषत: पंजाब, हरियाणामधून कडाडून विरोध होत आहे. त्यावरून होणाऱ्या आंदोलन आणि निदर्शनांत कॉंग्रेसनेही उडी घेतली आहे. स्वत: राहुल पंजाब आणि हरियाणातील ट्रॅक्टर रॅलींमध्ये सहभागी झाले.
त्यावेळी शेतकऱ्यांनी मांडलेल्या भूमिकेशी संबंधित व्हिडीओ टॅग करत राहुल यांनी ट्विटरवरून मोदी सरकारला लक्ष्य केले. त्या व्हिडीओमध्ये काही शेतकरी कृषी कायद्यांना तीव्र विरोध करण्याचा निर्धार व्यक्त करत असल्याचे दिसते.
शेतकऱ्यांचे आंदोलन आणि विरोधी पक्षांचा विरोध आदींमुळे कृषी कायदे वादग्रस्त ठरले आहेत. त्या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल आणि उद्योगजगताला लाभ होईल, असा आक्षेप घेतला जात आहे.





