बर्लिनमधील चाकू हल्ल्यातील संशयिताला पोलिसांकडून अटक

बर्लिन : आज बर्लिनमध्ये झालेल्या चाकू हल्ल्यातील संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. या चाकू हल्ल्यात स्पेनमधील एक पर्यटक जखमी झाला असून बर्लिनमधील होलोकास्ट स्मृतीस्थळाजवळ या संशयिताला अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. या चाकू हल्ल्यामागील नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. जर्मनीमध्ये उद्या (दि. २३) सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. त्यापुर्वी झालेल्या या चाकू हल्ल्यामुळे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हा चाकू हल्ला झाला आणि हल्लेखोराने धारदार चाकूने अथवा तत्सम धारदार वस्तूने एका व्यक्तीवर वार केले असावेत, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेच्या तीन तासांनंतर स्मृतीस्थळाला वेढा घातलेल्या पोलिसांसमोर हा व्यक्ती स्वतः येऊन उभा राहिला. त्याच्या हाताला रक्त लागले होते. त्यामुळे तो संशयित असल्याचे लगेच लक्षात आले, असे पोलिस प्रवक्ते फ्लोरियन नाथ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पोलिसांनी या संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्या जवळून वार केलेला चाकू ताब्यात घेण्यात आला आहे. या संशयिताची चौकशी करण्यात येत असून त्या चौकशीच्या आधारे पुढील तपास केला जाईल, असेही पोलीस प्रवक्त्याने सांगितले. चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या स्पॅनिश पर्यटकाला रुग्णालयात नेण्यात आले आहे.
बर्लिनच्या मध्यभागी असलेल्या ब्रँडनबर्ग गेटजवळील युरोपातील खून झालेल्या २,७०० ज्यूंची थडगी असलेल्या स्मारकासमोरच्या मैदानावर हा हल्ला झाला. नाझी जर्मनीच्या मार्गदर्शनाखाली होलोकॉस्टमध्ये मारल्या गेलेल्या ६० लाख ज्यूंचे स्मारक या ठिकाणी आहे.


