बर्लिन : जर्मनीच्या बर्लिन आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरामध्ये ड्रोन दिसल्यामुळे जवळपास दोन तासांसाठी विमान वाहतूक स्थगित करावी लागली होती. शुक्रवारी संध्याकाळी विमानतळाच्या परिसरात ही ड्रोन दिसली होती. विमान वाहतूक पुन्हा सुरळीत झाल्याचे अधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी सांगितले. शुक्रवारी संध्याकाळी ८ वाजून ८ मिनिटांपासून ९ वाजून ५८ मिनिटांपर्यंत बर्लिनच्या ब्रॅन्डेनबर्ग विमानतळावरील वाहतूक स्थगित करावी लागली होती. एका व्यक्तीला विमानतळाच्या परिसरामध्ये ड्रोन उडताना दिसले होते. पोलिसांनीही या गोष्टीला दुजोरा दिला होता. मात्र हे ड्रोन नंतर सापडू शकले नव्हते, असे स्थानिक पोलिसांनी माध्यमांना सांगितले. या ड्रोनबद्दल विमानतळाचे प्रतिनिधी आणि पोलिसांकडून अधिक माहिती मिळू शकली नाही. नाटोचे सदस्य असलेल्या देशांमधील प्रमुख विमानतळांवर अलिकडच्या काळात ड्रोन दिसण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. नाटोची प्रतिक्रिया क्षमता तपासण्यासाठी रशियाकडून ही ड्रोन पाठवली जात असावीत, असा अंदाज युरोपातल्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. गेल्या महिन्यात अशा प्रकारे ड्रोन दिसल्यामुळे म्युनिक विमानतळ २४ तासांच्या अवधीमध्ये दोनवेळा बंद करावा लागला होता.