Benjamin Netanyahu : ट्रम्प युद्धबंदी घडवून आणतील; बेंजामिन नेतान्याहू यांनी व्यक्त केला विश्वास

तेल अविव : आज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी होणाऱ्या चर्चेमुळे गाझा ओलिसांच्या सुटकेसाठी आणि युद्धबंदी करारावर चर्चा पुढे नेण्यास मदत होईल, असा विश्वास इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी व्यक्त केला. ट्रम्प यांनी या आठवड्यात करार होऊ शकतो असे भाकीत केले होते. नेतान्याहू अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेणार आहेत आणि युद्धबंदीबाबत चर्चा करणार आहेत. तर इस्रायली अधिकारी हमासशी अप्रत्यक्ष चर्चा करत आहेत. त्यांच्या या चर्चेचा उद्देश अमेरिकेच्या मध्यस्थीने गाझा ओलिसांची सुटका आणि युद्धबंदी करार करणे आहे. इराणसोबतचे १२ दिवसांचे युद्ध थांबल्यामुळे या प्रदेशात नवीन राजनैतिक संधींचा मार्ग मोकळा होईल, अशी इस्रायलला आशा आहे.
ट्रम्प यांच्याबरोबरच्या भेटीच्यावेळी इराणी अणुस्थळांवर अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांसाठी ट्रम्प यांचे आभार मानतील आणि इस्रायली वाटाघाटी करणारे कतारची राजधानी दोहा येथे गाझावरील करारासाठी प्रयत्न करत आहेत, असे नेतान्याहू यांनी पत्रकारांना सांगितले. सोमवारी कतारमध्ये इस्रायल आणि हमास यांच्यात दुसऱ्या दिवशी अप्रत्यक्ष चर्चा होणार होती. कतार आणि इजिप्तच्या मध्यस्थीने झालेल्या गाझा चर्चेतील आतापर्यंतचे वातावरण सकारात्मक असल्याचे इस्रायली अधिकाऱ्यांनी सांगितले. रविवारी झालेल्या सुरुवातीच्या बैठका अनिर्णीत राहिल्याचे पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी सांगितले. तर कतारमध्ये मानवतावादी मदतीच्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे, असे दुसऱ्या एका इस्रायली अधिकाऱ्याने सांगितले. परंतु त्यांनी अधिक तपशील दिले नाहीत.
नेतान्याहू यांच्या काही कट्टरपंथी आघाडीतील भागीदारांनी लढाई संपविण्यास विरोध केला आहे, परंतु २१ महिन्यांच्या युद्धामुळे इस्रायली लोक अधिकाधिक कंटाळले असल्याने, त्यांचे सरकार युद्धबंदीला पाठिंबा देण्याची अपेक्षा आहे. या वर्षाच्या सुरुवातीला झालेला युद्धबंदी मार्चमध्ये संपला आणि तो पुन्हा सुरू करण्याच्या चर्चा आतापर्यंत निष्फळ ठरल्या आहेत. दरम्यान, इस्रायलने गाझामध्ये आपली लष्करी मोहीम तीव्र केली आहे आणि अन्न वितरणावर कडक निर्बंध घातले आहेत.





