पुणे | “लाडकी बहीण’ पुण्यातही असुरक्षित

पुणे,{प्रभात वृत्तसेवा} – शहरातील भवानी पेठ परिसरात असलेल्या एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला. १५ ऑगस्टच्या दिवशीच हा प्रकार घडला. पीडित मुलगी सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे.
देवराज पदम आग्री ( १९) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. तो त्याच शाळेत शिकतो. समर्थ पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल असून त्याला अटक केली आहे.
भवानी पेठ परिसरात हे नामांकित हायस्कूल आहे. १५ ऑगस्टच्या दिवशी पीडित मुलगी शाळेतील दुसऱ्या मजल्यावर आपली स्कूल बॅग शोधण्यासाठी जात होती. यावेळी आरोपी मुलगा हा मुलांच्या स्वच्छतागृहाजवळ थांबला होता.
मुलगी जवळ येताच आरोपीने तिचा विनयभंग करत अत्याचाराचा प्रयत्न केला. त्यावर मुलीने प्रतिकार करत कसाबसा पळ काढला.
तिने आईला हा संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर आईने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. समर्थ पोलीस ठाण्यात याप्रकरणी आरोपी विरोधात ७४, ७५ (१) (i) पोक्सो ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलगी आठवी इयत्तेत शिक्षण घेते, तर मुलगा दहावीमध्ये शिक्षण घेत आहे. ते एकमेकांना ओळखत होते. तक्रार प्राप्त होताच आरोपीला अटक करण्यात आली आहे. – उमेश गित्ते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पोलीस स्टेशन





