Gold treasure : नाले सफाईदरम्यान अचानक चमकले नशीब; कामगारांना सापडला तब्बल 85 कोटींचा सोन्याचा खजिना!
Gold treasure : बेल्जियममधील सिंट-गिलिस-डेंडरमोंडे शहरात गटाराच्या खोदकामादरम्यान तब्बल ८५ कोटी रुपयांचा सोन्याचा खजिना सापडला आहे. जाणून घ्या या खजिन्याचा १९व्या शतकाशी काय संबंध आहे.

Gold treasure : गटाराच्या दुरुस्तीचे काम करत असताना अचानक जमिनीतून कोट्यवधींचा खजिना सापडल्याची थक्क करणारी घटना बेल्जियममधील सिंट-गिलिस-डेंडरमोंडे शहरात घडली आहे. भूमिगत सांडपाण्याच्या पाइपलाइनसाठी सुरू असलेल्या खोदकामादरम्यान सोन्याची नाणी, सोन्याचे बिस्किटे आढळून आल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात या खजिन्याची किंमत अंदाजे ९ दशलक्ष युरो म्हणजेच भारतीय चलनात सुमारे ८० ते ८५ कोटी रुपये आहे.
नाली खोदताना धातूचा आवाज आला. माती बाजूला केल्यावर कामगारांना सुरुवातीला ती साधी नाणी वाटली; मात्र अधिक खोलवर तपास केला असता जुन्या काळातील सोन्याच्या चमकदार पट्ट्या आणि लाद्या बाहेर आल्या. माहिती मिळताच नागरिकांची गर्दी जमू लागल्याने पोलिसांनी संपूर्ण परिसर सील करून जप्त केलेला खजिना सरकारी तिजोरीत सुरक्षित ठेवला आहे.
१९ व्या शतकातील मालकाशी संबंध –
इतिहासकारांच्या मते, हा खजिना १९ व्या शतकातील असून तत्कालीन प्रसिद्ध बिअर उत्पादक ‘थियोफिलस वान एशे’ यांच्या मालकीचा असण्याची दाट शक्यता आहे. त्या काळातील राजकीय अस्थिरता किंवा आर्थिक असुरक्षिततेमुळे त्यांनी ही संपत्ती तळघराच्या भिंतीत लपवून ठेवली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
खजिना कोणाला मिळणार?
बेल्जियमच्या कायद्यानुसार, ऐतिहासिक खजिन्याच्या मूळ वारसांचा शोध घेण्यासाठी ५ वर्षांची मुदत दिली जाते. या कालावधीत कोणीही कायदेशीर वारसदार समोर न आल्यास, मालमत्ता कायद्यानुसार ही संपूर्ण संपत्ती संबंधित जागेचा मालक आणि खजिना शोधणारे कामगार यांच्यात विभागली जाईल.





