सोनई, (वार्ताहर) – सोनईजवळील बेलेकरवाडी येथे असलेल्या रेणुका माता पोल्ट्री फार्म बंद करण्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने मारुती मंदिरासमोर उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. जोपर्यंत हा पोल्ट्री फार्म बंद करण्यात येत नाही, तोपर्यंत उठणार नसल्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. मात्र प्रशासनाकडून ग्रामस्थांच्या मागणीची कुठलीही दखल घेतली गेली नसल्याने ग्रामस्थांनी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. याआधी संबंधिताकडे या पोल्ट्री फार्मविषयी तक्रारी केल्या असता तक्रारदाराकडे एकही शासकीय अधिकारी फिरकला नसल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला आहे. बीडीओ ,तहसीलदार, जिल्हाधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या असता तक्रारदारांकडे संबंधित अधिकारी चौकशीसाठी कधीच गेले नाहीत. संबंधित पोल्ट्री फार्मकाशी संपर्क साधून अधिकारी मागे फिरत. या पोल्ट्री फार्ममुळे आसपासच्या रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. मयत झालेल्या कोंबड्या खड्डे घेऊन जवळच पुरल्या जात असल्याने त्याची दुर्गंधी खराब असल्याने ग्रामस्थांना येथे राहणे मुश्किल झाले आहे. या पोल्ट्री फार्ममधील पक्षाची पिसे जाळली जात असल्याने परिसरात धूर होऊन दुर्गंधी सुटत असल्याने येथील रहिवाशांना येथे राहणे मुश्किल झाले आहे. या पोल्ट्री फार्मच्या कडेला अनेक वस्त्या असल्याने एक किलोमीटरच्या अंतरापर्यंत याची दुर्गंधी सुटली असल्याने मागणी करूनही हा पोल्ट्री फार्म बंद केला जात नाही. विनंती अर्ज करूनही संबंधित विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले. मनुष्याच्या आरोग्याची खेळण्याचा हा प्रकार असून, शासनाने याची गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता आहे.