रेल्वे स्थानक परिसर होणार भिक्षेकरी मुक्त

50 जणांवर कारवाई : लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दलातर्फे मोहीम
पुणे – रेल्वे स्थानक परिसर भिक्षेकरी मुक्त करण्यासाठी लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. यांतर्गत लोहमार्ग पोलिसांनी या वर्षात 15 सप्टेंबरपर्यंत 50 जणांवर कारवाई केली आहे. यंदा कारवाई अधिक होणार असून वेगही वाढवला आहे, अशी माहिती पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेशसिंग गौड यांनी दिली.
रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवेश केल्यापासून प्लॅटफॉर्मवर जाईपर्यंत आणि अगदी रेल्वेत बसल्यानंतरही प्रवाशांना भिक्षेकऱ्यांचा त्रास सहन करावा लागतो. स्थानक परिसरातील आरक्षण केंद्रासमोर हे चित्र मोठ्या प्रमाणावर दिसून येत होते. मात्र, स्थानकाचा विकास होत असताना, हे चित्र बदलण्याची गरजही व्यक्त केली जात होती. दररोज सुमारे अडीच लाख प्रवाशांची ये-जा असलेले पुणे रेल्वे स्थानक भिक्षेकरी मुक्त करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. गेल्या 2 महिन्यांपासून स्थानक परिसरात भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी भिक्षेकरी स्वीकार केंद्रात करण्यात येत आहे. आठवड्यात दर गुरुवारी आणि रविवारी ही कारवाई केली जाते.
पुणे रेल्वे स्थानकातून उत्तर भारत आणि दक्षिण भारतात दररोड अडीचशेहून अधिक गाड्यांची ये-जा होते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील हे महत्त्वाचे स्थानक असून, बहुतांश लांब पल्ल्याच्या गाड्या अन्य स्थानकात थांबत असल्याने सर्व प्रवाशांना पुणे स्थानकात यावे लागते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. या गर्दीत भिक्षेकरी मोठ्या संख्येने स्थानक परिसरात वावरतात. त्यांना लोहमार्ग पोलिसांकडून अटकाव केला जात आहे.
…तर मोहिमेला बसू शकते खीळ
भिक्षेकरी स्वीकार केंद्राची क्षमता मर्यादित आहे. त्यामुळे केंद्र पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर त्या ठिकाणी भरती करणे शक्य नसते. अशावेळी केंद्र व्यवस्थापनाकडून नवीन भरती करण्यास असमर्थता दर्शविली जाते. त्यामुळे लोहमार्ग पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेलाही फटका बसतो, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.





