Beed Accident : महाराष्ट्र हादरला..! तुळजापूरला जाणाऱ्या ५ भाविकांचा भीषण अपघातात मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन
Beed Accident : पंढरपूर-खामगाव पालखी महामार्गावर रविवारी एक मन हेलावून टाकणारी भीषण अपघाताची घटना घडली आहे.

Beed Accident : बीड जिल्ह्यातील पंढरपूर-खामगाव पालखी महामार्गावर बस आणि कारच्या भीषण धडकेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शिंदेवाडी फाट्याजवळ हा अपघात झाला. माजलगाव येथून आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूरला निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून बसच्या पुढील भागाचेही नुकसान झाले आहे. (Beed Accident)
नेमका अपघात कसा घडला?
मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव येथील काही जण कारमधून तुळजापूरच्या दिशेने जात होते. याचदरम्यान शिंदेवाडी फाट्याजवळ कार आणि बस यांच्यात जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला. या दुर्घटनेत कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. (Beed Accident)
अपघाताची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. घटनास्थळी दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले. या दुर्घटनेमुळे मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Beed Accident)
अपघातातील मृतांची नावे
ओमकार महादेव गिरी (वय २४), गजानन महादेव नामदास (वय ३८), माऊली गजानन नामदास (वय ११), सोमनाथ बडे (वय २३), अनिल आचार्य (वय ४०) दुर्घटनेत मृत्यू झालेल्या पाच जणांची नावे आहेत. (Beed Accident)
शिंदेवाडी फाट्यावर ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन
या भीषण अपघातानंतर शिंदेवाडी परिसरातील ग्रामस्थ संतप्त झाले असून त्यांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. शिंदेवाडी फाट्याजवळील रस्त्यावरील उंचवट्यामुळे किंवा जंपमुळे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या ठिकाणी तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. (Beed Accident)
वर्षभरात ५० ते ७० जणांचा मृत्यू झाल्याचा ग्रामस्थांचा दावा
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षभरात या महामार्गावर झालेल्या विविध अपघातांत सुमारे ५० ते ७० जणांना जीव गमवावा लागला आहे. या समस्येबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदने देऊनही ठोस उपाययोजना झाल्या नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. (Beed Accident)
महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच रस्त्याच्या कंत्राटदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. या मागण्यांवर प्रशासन काय भूमिका घेते आणि अपघातप्रवण ठिकाणी कोणत्या उपाययोजना केल्या जातात, याकडे आता लक्ष लागले आहे. (Beed Accident)


