Beed Crime : बीडच्या परळीत गुंडराज…! मुंडे गँगकडून तरुणाचं अपहरण करून अमानुष मारहाण

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असतानाच आता बीडमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेमुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरून गेला. या घटनेचा भयानक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शिवराज हनुमान दिवटे (रा. परळी, जि, बीड) असं अपहरण करून मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परळीमध्ये तरुणाचे पेट्रोल पंपावरून अपहरण केले. त्यानंतर त्याला लाठ्याकाठ्याने आणि बेल्टने अमानुष मारहाण करण्यात आली.
नेमकं काय घडलं?
परळी येथील रिलायन्स पेट्रोल पंपासमोरून शुक्रवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास शिवराज हा जलालपूर येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमावरुन परतत होता. त्यावेळी त्याचे अपहरण झाले. यानंतर टोकवाडी गावातील रत्नेश्वर मंदिर परिसरात समाधान मुंडे आणि इतर आरोपींनी शिवराजला मारहाण केली.
दहशत पसरवण्यासाठी समाधान मुंडेच्या साथीदारांनी या घटनेचा व्हिडीओदेखील चित्रीत केला होता. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बीड पोलिसांनी समाधान मुंडे आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.यामध्ये समाधान मुंडे आणि त्याचे साथीदार शिवराज दिवटे याला बेदम चोप देताना दिसत आहेत. शिवराजला जमिनीवर खाली पाडून चारही बाजूंनी समाधान मुंडे आणि त्याचे साथीदार त्याला मारत आहेत. या सगळ्यांच्या हातात काठ्या आणि बांबू दिसत आहेत.
हे सगळेजण बांबू आणि काठ्यांनी शिवराज दिवटे याला मारताना दिसत आहेत. यावेळी शिवराज दिवटे जोरजोरात ओरडत होता. मात्र, तरीही समाधान मुंडे आणि त्याचे साथीदार त्याला मारत राहिले. या मारहाणीत शिवराज गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.



