बीडमध्ये धक्कादायक प्रकार; ‘वंचित’च्या उमेदवाराला काळे फासून चाबकाने मारहाण

बीड – बीडमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पक्षातीलच कार्यकर्त्यांकडून तोंडाला काळे फासल्याचा तसेच चाबकाने फोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. भाजप पदाधिकाऱ्यांकडून पैसे घेतल्याच्या आरोपातून हा राजकीय राडा झाल्याचे सांगण्यात येत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा नामांकन अर्ज अवैध ठरल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने अपक्ष उमेदवार सचिन चव्हाण यांना पाठिंबा दर्शवला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, बीडच्या केज मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सचिन चव्हाण हे प्रचार करत असताना त्यांच्या तोंडाला काळे फसत मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
सचिन चव्हाण यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांनी केला असून यामुळेच शैलेश कांबळे यांच्यासह वंचितच्य स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सचिन पवार यांच्या तोंडाला काळे फासत मारहाणही केली. याबाबत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याचेही शैलेश कांबळे यांनी सांगितले आहे. या घटनेची सध्या जिल्ह्यात चर्चा होत असून याबाबत अद्याप पोलिसांत नोंद झालेली नाही.
भाजप पदाधिकाऱ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप –
सचिन चव्हाण यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप केला जात आहे, याचे व्हिडिओही समोर आले असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर वंचितच्या स्थानिक नेत्यांनी प्रकाश आंबेडकर यांची बदनामी केल्याचा आरोप करत चव्हाण यांना मारहाण केली.





