Beed Crime : पोलीस दलात खळबळ ! शेतकऱ्याकडून लाच घेताना अधिकाऱ्याला अटक
बीड (Beed Crime) जिल्हा पोलीस दलातून एक अत्यंत संतापजनक बातमी समोर आली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या वडिलांच्या विम्याचा दावा न्यायालयात दाखल करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे देण्यासाठी तब्बल १०,००० रुपयांची लाच स्वीकारताना एका पोलीस अंमलदाराला रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

Beed Crime : बीड (Beed Crime) जिल्हा पोलीस दलातून एक अत्यंत संतापजनक बातमी समोर आली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या वडिलांच्या विम्याचा दावा न्यायालयात दाखल करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे देण्यासाठी तब्बल १०,००० रुपयांची लाच स्वीकारताना एका पोलीस अंमलदाराला रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
दत्तात्रय बळवंत असे लाचखोर अंमलदाराचे नाव असून, तो बीडमधील (Beed Crime) नेकनूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही धडक कारवाई केली.
काय आहे नेमके प्रकरण?
तक्रारदाराच्या वडिलांचा एका अपघातात मृत्यू झाला होता. या अपघाताचा विम्याचा दावा कोर्टात सादर करण्यासाठी पोलीस स्टेशनकडून मिळणाऱ्या शासकीय कागदपत्रांची तक्रारदाराला अत्यंत गरज होती. ही कागदपत्रे मिळवण्यासाठी तक्रारदार गेल्या काही दिवसांपासून नेकनूर पोलीस ठाण्यात वारंवार चकरा मारत होता.
परंतु, ही शासकीय कागदपत्रे देण्यासाठी अंमलदार दत्तात्रय बळवंत याने तक्रारदाराकडे १५,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली. अखेर तडजोड होऊन १०,००० रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली.
‘एसीबी’चे जाळे आणि रंगेहाथ अटक
तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जालना एसीबीच्या पथकाने नेकनूर पोलीस ठाणे परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून १०,००० रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना दत्तात्रय बळवंत याला एसीबीच्या पथकाने (Beed Crime) रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे बीड पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
जुना वादग्रस्त व्हिडिओ पुन्हा व्हायरल
लाचखोर अंमलदार दत्तात्रय बळवंत हा यापूर्वीही अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. काही महिन्यांपूर्वी परिसरामध्ये पवनचक्कीची लाईन उभारण्याचे काम सुरू होते. त्यावेळी शेतीच्या कारणावरून झालेल्या एका वादात, याच दत्तात्रय बळवंतने एका शेतकऱ्याच्या मुलाला अत्यंत अरेरावीची भाषा वापरत “तुझे कॅरेक्टर (चारित्र्य) खराब करून टाकीन” अशी थेट धमकी दिली होती.
त्यावेळी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता आणि पोलीस प्रशासनाच्या वर्तणुकीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. आज लाचखोरीच्या प्रकरणात तो रंगेहाथ पकडला गेल्यानंतर, त्याचा तो जुना धमकीचा व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
बीडमध्ये लाचखोरी थांबणार कधी?
आधीच वडिलांच्या छत्र हरपलेल्या एका दुःखी मुलाकडून शासकीय कागदपत्रांसाठी लाच मागणाऱ्या अशा पोलीस कर्मचाऱ्यांमुळे खाकी वर्दी डागाळली आहे. या कारवाईनंतर “बीड (Beed Crime) जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमधील ही लाचखोरी कधी थांबणार?” असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जालना एसीबीचे पथक करत आहे.






