Beed Crime: खळबळजनक ! बीडमध्ये आणखी एका सरपंचाचे अपहरण

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असताना आता बीडमधून आणखी एका सरपंचाचे अपहरण करण्यात आले आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. या हत्या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे तर ३ जण अजून फरार आहेत. यादरम्यान अजून एका सरपंचाचे अपहरण झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
ज्ञानेश्वर इंगळे माजी सरपंचाचे नाव आहे. ते केज तालुक्यातील कळंब अंबा येथील रहिवासी आहेत. पंकजा मुंडे यांच्याकडून फंड देतो म्हणून केज मधून मुंबईला जायचे म्हणून त्यांना गाडीत बसवले. पाटोदा येथे गेल्यानंतर तीन लाख रुपये काढून घेत त्यांना एका खोलीत हात आणि पाय बांधून डाबून ठेवण्यात आले. यादरम्यान त्यांनी आरोपींच्या डोळ्यात धूळ फेकत आपली सुटका करून घेतली.
सरपंचाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील दोन सरपंचांवर जीवघेणा हल्ला झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सरपंचाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सरपंच पदावर काम करणाऱ्या व्यक्तींची सुरक्षितता पुन्हा एकदा धोक्यात आली आहे. पोलीस प्रशासन व महाराष्ट्र शासनाचे सरपंचांच्या अशा घटनेकडे दुर्लक्ष झाल्याने हे प्रकार होत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या व महाराष्ट्र शासनाच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.





