राजगडावर मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला महिला पर्यटक गंभीर जखमी

वेल्हे- (प्रतिनिधी) किल्ले राजगड येथे पर्यटनासाठी आलेल्या चार जणांच्या कुटूंबावर सुवेळामाची येथे मधमाश्यांनी हल्ला केला. यात रोहिणी सागर वराट वय वर्ष २९ राहणार वाकड भूमकर चौक पुणे या दोनशे फूट खोल दरीत कोसळून गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी नसरापूर येथे नेण्यात आले असून. त्यांचे पती सागर वराट, मावसभाऊ व अन्य कुटुंबातील सदस्य यांनाही माशांनी चावा घेतला असून. त्यांना जुलाब उलट्या होत असल्याने रुग्णालयात दाखल केले आहे.
बेळगाव तेथून आलेल्या सोळा पर्यटकांना देखील माशांनी चावा घेतला. दरीत पडलेल्या महिलेला वर काढण्यासाठी खोडद तालुका जून्नर येथून आलेले पर्यटक रोहित जाधव, अभिषेक जंगले, वैभव थेटे, स्थानिक विशाल पिलावरे, बापू साबळे, आकाश कचरे, दिपक पिलावरे, सुभाष जाधव, नाशिक येथील पर्यटक रोहित देवरे, शुभम भोजणे, गुंजवणे येथील पोलीस पाटील बाळकृष्ण रसाळ, सतिश मोरे, सतिश कडू, गोविंद रसाळ, वैभव आल्हाट, दादू जगताप यांनी झोळी करुन बाधितांना राजगड पायथा पाली व गुंजवणे येथे आणण्यात आले.
सुट्टीच्या दिवसात राजगडावर मोठ्या प्रमाणात उन्हाळी सहली साठी पर्यटक येत असून. काही पर्यटकांच्या उपद्रवी पणामुळे व सुगंधित अत्तरे, सेंट आणि अन्य सुगंधित द्रव्य, सिगरेट, बिडी यांच्या वासामुळे माशा चलबिचलीत होतात व हल्ला करतात.
– बाळासाहेब रसाळ – पोलीस पाटील गुंजवणे
सुवेळा माची व बालेकिल्ला या परिसरात मधमाशांची मोठी पोळी आहेत. या ठिकाणी जाताना अरुंद पाय वाटेने जावे लागते. त्याठिकाणी जाताना विशेष काळजी घ्यावी लागते. अशा घटना वारंवार घडत असून पुरातत्व विभागानेही उपाययोजना करायला पाहिजेत.
-आनंद देशमाने – माजी जिल्हा परिषद सदस्य





