…म्हणून उत्तर प्रदेशातील जागा वाटपावर कॉंग्रेस नेते नाराज

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशात आगामी लोकसभा निवडणूक लढण्याच्या संदर्भात कॉंग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्यात आघाडी झाली आहे. त्यानुसार कॉंग्रेस १७ तर समाजवादी पार्टी ६३ जागा लढणार आहे. मात्र या जागावाटपावरून कॉंग्रेसचे राज्यातील नेते नाराज आहेत. आम्ही जेवढ्या जागांची मागणी केली होती तेवढ्या जागा आम्हाला मिळाल्या नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
त्यातही कॉंग्रेसला आघाडीत ज्या १७ जागा मिळाल्या आहेत की ज्यातील ६ जागांवर त्यांना १९८० च्या दशकानंतर एकदाही विजय मिळालेला नाही. प्रयागराज, अमरोहा, बुलंदशहर, सहारणपूर आणि देवरिया या पाच जागांवर कॉंग्रेसने शेवटचा विजय १९८४ मध्ये मिळवला होता. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर संपूर्ण देशात त्यावेळी कॉंग्रेसबद्दल सहानुभूतीची लाट होती. त्यात हे विजयही मिळाले आहेत.
सीतापूर ही कॉंग्रेसला मिळालेली आणखी एक जागा शेवटची त्यांनी १९८९ च्या निवडणुकीत जिंकली होती. उर्वरित जागांपैकी बहुतेक जागा अशा आहेत की तेथे पक्षाला विजयाचीअजिबातच खात्री नाही. केवळ कॉंग्रेसच नाही तर समाजवादी पार्टीचीही या जागांवर हीच स्थिती असून त्यांनाही तेथे कोणता जनाधार नाही. सीतापूर येथून मायावती यांचा बहुजन समाज पक्ष आणि भारतीय जनता पार्टी यांचा आळीपाळीने विजय झाला आहे.
या मतदार संघात कुर्मी मतदारांची संख्या लक्षणीय आहे. कॉंग्रेसच्या एका नेत्याच्या म्हणण्यानुसार आम्ही लखीमपूर खीरी मतदार संघाची मागणी केली होती. तेथे आम्ही एका बड्या ओबीसी नेत्याला, एका माजी खासदाराला आणि त्यांच्या कन्येला पक्षात सहभागी करून घेतले होते. त्यामुळे ती जागा आम्हाला विजयाची खात्री देणारी होती. मात्र ती जागा न देता आम्हाला शेजारची जागा देण्यात आली.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार जे माजी खासदार रवि वर्मा कॉंग्रेसमध्ये आले आहेत त्यांना आता सीतापूर येथून लढण्यासाठी तयार केले जात आहे. वर्मा हेही कुर्मी असून त्यांच्यामुळे शेजारच्या बाराबंकी मतदार संघातील कुर्मी मतदारांवरही त्याचा प्रभाव पडेल. बाराबंकी येथून भाजपचे माजी खासदार पी. एल. पुनीया यांचे पुत्र तनुज पुनीया यांना भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
सहारणपूर येथेही २००४ मध्ये शेवटच्यांदा सपाचा उमेदवार जिंकला होता. तेंव्हापासून ही जागा कधी भाजप तर कधी बसपकडे असते. अमरोहातही १९९९ नंतर कॉंग्रेस उमेदवार विजयी झालेला नाही. अर्थात यावेळी अमरोहाचे बसपाचे खासदार दानिश अलि स्वत:हून कॉंग्रेसमध्ये येणार असल्यामुळे ही जागा जिंकण्याची कॉंग्रेसला यंदा आशा आहे.
कॉंग्रेसच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार त्यांनी जागावाटपात गाझियाबाद, प्रयागराज, मथुरा, बुलंदशहर आणि बांसगांव या जागा मागितल्याही नव्हत्या. त्या आम्हाला देण्यात आल्या. का दिल्या याचेही कोणते स्पष्टीकरण त्यांनी दिले नाही. अमेठी आणि रायबरेली सोडले तर आम्हाला हवी असलेली एकही जागा समाजवादी पक्षाकडून मिळाली नाही. केवळ उत्तर प्रदेशात आघाडी तगून राहावी म्हणून जड अंत:करणाने कॉंग्रेसने या जागा स्विकारल्या आहेत.
प्रमुख चेहऱ्यांची उदासीनता
कॉंग्रेसच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार पक्षाचा प्रमुख मुस्लिम चेहरा असलेले राजबब्बर यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी यंदा निवडणूक लढवण्याबाबत फारशी उत्सुकता दाखवलेली नाही. मथुरेसाखी जागा आम्हाला देण्यात आली. मथुरा हा राष्ट्रीय लोकदलाचा बालेकिल्ला असल्याचे सगळ्यांना माहिती आहे. रालोदही आता भाजपच्या एनडीएत सहभागी झाला आहे. आम्ही तेथे करायचा म्हणून उमेदवार उभा करू. अगदीच स्थानिक कोणी चेहरा मिळाला नाही तर बाहेरच्या व्यक्तीला आणून येथे उभे करावे लागेल.





