ऑनलाइन व्यवहार करताना सतर्कता बाळगा

फसवणूक रोखण्यासाठी पोलिसांच्या सायबर विभागाचे नागरिकांना आवाहन
पिंपरी – नोटांवरही “करोना’चे विषाणू असू शकतात. यामुळे अनेकांनी नोटा देणे आणि घेणे बंद केले आहे. नागरिकांनी ऑनलाइन व्यवहारास प्राधान्य दिले आहे. तसेच “लॉकडाऊन’मुळे नागरिक घरीच असल्याने त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. मात्र नागरिकांनी आपली फसवणूक होणार नाही, याकडे लक्ष देऊन फसवणूक टाळावी, असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर विभागाने केले आहे.
“करोना’ व्हायरसचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी सरकारने महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात जमावबंदी व संचारबंदीचे आदेश दिले आहेत. यामुळे नागरिक घरात राहूनच स्वतःची काळजी घेत आहेत. अनेकजण कार्यालयीन कामकाज व दैनंदिन व्यवहार ऑनलाईन पध्दतीने करीत आहेत. मात्र ऑनलाइन काम व आर्थिक व्यवहार करताना फसवणूक होऊ नये म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन सायबर विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी केले आहे. त्यासाठी त्यांनी नागरिकांना काही सूचनाही केल्या आहेत.
पेटीएम केवायसीच्या नावाखाली आलेल्या कोणत्याही फोन कॉलला प्रतिसाद देऊ नये. कारण पेटीएम कधीच केवायसीसाठी ग्राहकाला फोन करीत नाही. माहिती नसलेल्या कोणत्याही अनोळखी साइटवर ऑनलाईन व्यवहार करु नये . तसेच कोणत्याही अनोळखी लिंकला क्लिक करुन ती ओपन करण्याचा प्रयत्न करु नये. अनोळखी वेबसाईटला व्हिजिट करु नये. त्यावरुन आपले मोबाइल व संगणकामधील डेटा, बॅंक डिटेल्स, व्हाटस ऍप, फेसबुक व गॅलरीतील फोटो वगैरे माहिती चोरली जाऊ शकते.
“करोना’च्या नावाखालीही फसवणूक
आजकाल “करोना’ची प्रचंड भीती पसरली असून सोशल साइट्सवरही सध्या “करोना’ हाच एक विषय आहे. “करोना’बाबत माहिती देणाऱ्या अनेक पोस्ट्स व्हायरल होत आहेत. काही पोस्ट्समध्ये “करोना’विषयी इत्यंभूत माहिती देण्याच्या नावाखाली काही लिंकही पसरत आहेत. “करोना’ व्हायरसची माहिती घेण्यासाठी कोणत्याही अनोळखी लिंकला क्लिक करु नये. कारण त्यामुळे मोबाइल व संगणकामधील माहिती शेअर होऊन आपल्याला आर्थिक नुकसान होऊ शकते, असा इशारा पोलीस निरीक्षक काटे यांनी दिला आहे.
असे ऍप डाऊनलोड करू नका…
अनोळखी व्यक्तीकडून आलेली ऑनलाइन पैसे स्वीकारण्याची विनंती स्वीकारु नये. तसेच कोणत्याही अनोळखी नंबरद्वारे पैसे, नोकरी, लॉटरी, कमी व्याजात मोठया रकमेचे कर्ज, गुंतवणूक, ओएलएक्स वरुन खरेदीचे आमिष दाखवले जात असेल तर त्यावर विश्वास ठेऊ नये. स्वतःच्या मोबाइलमध्ये प्ले स्टोरद्वारे क्वीक सपोर्ट, एनी डेस्क, टिमव्यूवर, रिमोट डेस्क असे कोणतेही ऍप डाऊनलोड करु नये. आपल्या डेबिट/क्रेडिट कार्डची माहिती, 16 अंकी नंबर, पिन ओटीपी क्रमांक तसेच इतर कोणतीही माहिती कोणालाही देऊ नये. कोणत्याही कारणासाठी आपली वैयक्तिक माहिती जसे की जन्मतारीख, जन्मस्थान, पूर्वीचे नाव, लोकेशन किंवा कौटुंबिक तपशील, पत्ता फोन नंबर, आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्सची माहिती देऊ नका, असे आवाहन सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी नागरिकांना केले आहे.





