Satara News : निवासी सदनिका भाड्याने द्याल तर खबरदार…; मुख्याधिकाऱ्यांनी दिला फौजदारीचा इशारा

सातारा : एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी सुधारणा अभियानामध्ये लाभार्थ्यांना दिलेल्या निवासी सदनिका भाड्याने देण्याचा प्रकार उघडकीस आला असून त्याची गंभीर दखल घेत सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी सदनिका भाड्याने दिलेल्या आढळल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी सुधारणा अभियानामध्ये गलिच्छ वस्तींचा बिमोड करून स्वच्छ सुंदर वसाहती तयार करणे हा मूळ हेतू आहे. मात्र, या योजनेअंतर्गत सदरबाजार येथील भीमाबाई आंबेडकरनगरामध्ये 332 घरे वितरित करण्यात आली आहेत. ही घरे भाड्याने देऊन दुसरीकडे झोपडपट्टी उभारण्याचे काम होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. याबाबत पालिकेने या इमारतीमध्ये ‘घर टू घर’ सर्वेक्षण करून भाडेतत्त्वावर घरे देणाऱ्यांना दणका देण्याचा निर्धार केला आहे.
घरकुल योजनेतून एकूण 11 इमारतींमध्ये 332 घरे बांधण्यात आली. या घरांचे पालिकेकडून 2020- 21 मध्ये वाटप करण्यात आले. मात्र, या योजनेतील सदनिका लाभार्थी वापरत नसल्याच्या तक्रारी होऊ लागल्या. या इमारतींना मूलभूत सुविधा नगरपालिकेकडून दिल्या जात नसल्याच्या तक्रारी झाल्या.
पालिकेने या घरांचे सर्वेक्षण करण्याचा निर्धार केला आहे. ज्यांनी आपली घरी इतरांना वापरायला दिली आहेत अशा संबंधितांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. संबंधित घर ताब्यात घेऊन पालिका ते इतर लाभार्थ्यांना देणार आहे. पालिकेचे अधिकारी येत्या दोन दिवसांत या सर्वेक्षणाला सुरुवात करतील, अशी माहिती मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिली आहे.





