UPI पेमेंट करत असाल तर रहा सावध; काय आहे जंप्ड डिपॉझिट स्कॅम? एका चुकीमुळे होऊ शकता कंगाल

Jumped Deposit Scam | अलिकडच्या काळात ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी लोकांचा अधिक कल असल्याचे दिसते. मात्र एकीकडे ऑनलाइन व्यवहाराचा प्रतिसाद वाढत असताना दुसरीकडे मात्र सायबर गुन्हे घडण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. आधी पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बँकेत जावे लागत होते, मात्र आता काही सेकंदात कुठूनही कुणालाही पैसे ट्रान्सफर करता येतात.
पैशाचे डिजिटल व्यवहार करणे सोयीचे झाले असले तरी त्याचे तोटेही समोर येऊ लागले आहेत. ऑनलाइन घोटाळे आणि फसवणुकीची प्रकरणे दररोज उघडकीस येतात. दरम्यान, एक नवीन जंप्ड डिपॉझिट स्कॅम चर्चेत आले आहे. ज्याद्वारे सायबर गुन्हेगाराकडून तुमची सहजरित्या आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे.
सायबर गुन्हे घडण्याचे प्रमाण वाढत चालल्याने अलीकडेच तामिळनाडू सायबर क्राईम विभागाने Jumped Deposit Scam विषयी इशारा दिला आहे. ज्याप्रमाणे सरकार आणि टेलिकॉम कंपन्या घोटाळे आणि ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी नवीन नियम आणत आहेत. त्याचप्रमाणे सायबर गुन्हेगारही लोकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन पद्धती अवलंबत आहेत.
सध्या, सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जम्प्ड डिपॉझिट स्कॅमचा वापर करत आहेत. अलीकडच्या काळात याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. मात्र हे Jumped Deposit Scam नेमकं आहे का? यापासून सावध राहण्यासाठी नेमकं काय केले पाहिजे? हे जाणून घेऊयात… Jumped Deposit Scam |
काय आहे Jumped Deposit Scam?
या घोटाळ्यात फसवणूक करणारे व्यक्तीच्या खात्यात आधी छोटी रक्कम जमा करतात. त्यानंतर, संबंधित व्यक्तीला कॉल करून, पैसे चुकीच्या पद्धतीने ट्रान्सफर झाल्याचा दावा केला जातो आणि ते पैसे परत पाठवण्याची विनंती केली जाते. ग्राहक हा अनपेक्षित जमा झालेला रक्कम पाहून खात्रीसाठी UPI PIN टाकतो, ज्यामुळे फसवणूक करणारे त्यांच्या खात्यातील रक्कम काढून घेतात. जर तुम्ही ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करत असाल किंवा तुमच्या खात्यात कोणीतरी पैसे जमा करण्यास लावत असाल तर तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अन्यथा हा नवीन घोटाळा तुम्हाला क्षणार्धात कंगाल बनवू शकता. Jumped Deposit Scam |
NPCI चे स्पष्टीकरण
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने या घोटाळ्याबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. NPCI च्या मते, UPI प्लॅटफॉर्मवर अशा स्वरूपाची कोणतीही फसवणूक नोंदवली गेलेली नाही. त्यांनी वापरकर्त्यांना UPI प्रणाली सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. UPI प्रणाली ही डिव्हाइस-आधारित पेमेंट सिस्टम असून, ती वापरकर्त्याच्या मोबाईल नंबर आणि डिव्हाइसशी सुरक्षितपणे जोडली असल्याने फक्त खातेदारच व्यवहार सुरू करू शकतो.
ग्राहकांनी अशी बाळगावी सावधगिरी?
* तुमच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला आला तर तुम्ही त्या मेसेजला लगेच प्रतिसाद देऊ नये.
* अनपेक्षित रकमेचा व्यवहार दिसल्यास कोणतीही PIN माहिती उघड करू नका.
* पैसे जमा करण्याचा मेसेज येताच ॲपमध्ये लॉग इन करण्याची चूक करू नका.
* संदेश प्राप्त झाल्यानंतर किमान 15-20 मिनिटांनी तुमच्या खात्यातील शिल्लक तपासा.
* UPI ॲप तपासताना, पहिल्यांदा चुकीचा UPI पिन टाका.
* तुम्ही चुकीचा UPI पिन टाकल्यास, स्कॅमरची विनंती अयशस्वी होईल.
* डिजिटल व्यवहारांसाठी अधिकृत आणि सुरक्षित प्लॅटफॉर्मचा वापर करा.
* फसवणूक झाल्यास त्वरित बँकेशी किंवा अधिकृत तक्रार नोंदवण्यासाठी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधा.





