IPL Expansion BCCI : आयपीएलमध्ये १२ संघांची एन्ट्री होणार की नाही? बीसीसीआयने स्पष्टच सांगितलं; २०२८ च्या चर्चांवर मोठा खुलासा
IPL Expansion BCCI : आयपीएलमधील संघांची संख्या १० वरून १२ पर्यंत वाढणार असल्याचा दावा माध्यमांनी केला होता. बीसीसीआय सचिवांनी स्पष्ट केले आहे की, बीसीसीआयमध्ये अशा प्रकारची कोणतीही चर्चा सुरू नाही.

BCCI Denies IPL Expansion 2028 Devajit Saikia Clarification Teams Count : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) संघांची संख्या १० वरून १२ करण्याच्या चर्चांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पूर्णविराम दिला आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केले की, नजीकच्या काळात आयपीएलमध्ये नवीन संघांचा समावेश करण्याची कोणतीही योजना नाही. आगामी २०२८ च्या हंगामापासून दोन नवीन संघ जोडले जाणार असल्याचा दावा काही माध्यमांच्या वृत्तात केला जात होता; मात्र बोर्डाच्या अंतर्गत अगदी अनौपचारिक स्तरावरही अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या विस्ताराचा कोणताही विचार नाही; देवजीत सैकियांचे स्पष्टीकरण
जागतिक क्रिकेट विश्वात आयपीएलची लोकप्रियता आणि व्यावसायिक मूल्य सातत्याने वाढत असले तरी तूर्तास संघांची संख्या वाढवण्याचा विचार नाही. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया म्हणाले, “२०२८ मध्ये आयपीएल १२ संघांची स्पर्धा करण्याच्या शक्यतेवर आम्ही औपचारिक किंवा अनौपचारिक अशी कोणतीही चर्चा केलेली नाही. सध्या हा प्रस्ताव आमच्या विचारार्थ मुळीच नाही.” त्यामुळे नव्या संघांच्या आगमनाबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
२०२७ मधील २० व्या हंगामावर बीसीसीआयचे संपूर्ण लक्ष –
🚨
IPL 2028 to continue with 10 teams! No immediate expansion to 12 teams, confirms BCCI Secretary Devajit Saikia.Happy with this move? https://t.co/KMyz1aHV83
— 𝑪𝒉𝒂𝒓𝒂𝒏𝑪𝒓𝒖𝒛 (@Charan7SK) November 11, 2026
बीसीसीआयचे संपूर्ण लक्ष सध्या आयपीएलच्या आगामी ऐतिहासिक हंगामावर केंद्रित आहे. २००८ मध्ये सुरू झालेल्या या लीगचा २०२७ मध्ये २० वा हंगाम रंगणार आहे. याविषयी बोलताना सैकिया म्हणाले, “आमचे संपूर्ण लक्ष २०२७ मधील आयपीएलवर आहे, जे या स्पर्धेचे २० वे सत्र असणार आहे. हा एक अतिशय भव्य सोहळा असेल. आम्ही सध्या केवळ याच्याच तयारीचा विचार करत असून, त्यापुढील कोणत्याही योजनेवर विचार करत नाही आहोत.”
मीडियातील बातम्या केवळ निराधार अफवा; अधिकृत नकार
संघांची संख्या वाढवण्याबाबत माध्यमांमध्ये सुरू असलेल्या बातम्यांना देवजीत सैकिया यांनी केवळ निराधार अफवा ठरवले. “माध्यमांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या ही काही लोकांच्या कल्पकतेतून आलेली निव्वळ अटकळ आहे. त्यावर मला कोणतीही टिप्पणी करायची नाही, तसेच या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही,” असे सांगत त्यांनी या वृत्तांची विश्वासार्हता फेटाळून लावली.





