Harry Brook Ban : इंग्लंडच्या स्फोटक खेळाडूवर BCCIची मोठी कारवाई! आयपीएल खेळण्यावर घातली दोन वर्षांची बंदी

BCCI bans Harry Brook from IPL : बीसीसीआयने इंग्लंडचा आक्रमक फलंदाज हॅरी ब्रूकला पुढील दोन वर्षांसाठी आयपीएलमधून बंदी घातली आहे. बोर्डाच्या नवीन धोरणानुसार, ब्रूक पुढील दोन वर्षे लिलावात सहभागी होऊ शकणार नाही. बीसीसीआयने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला (ईसीबी) याबद्दल माहिती दिली आहे. खरं तर, ब्रुकने अलीकडेच शेवटच्या क्षणी या हंगामातून त्याचे नाव मागे घेतले. या चुकीबद्दल भारतीय बोर्डाने त्याला शिक्षा केली आहे.
बीसीसीआयने हॅरी ब्रूकवर घातली बंदी –
हॅरी ब्रूकने २ कोटी रुपयांच्या बेस प्राईससह लिलावात प्रवेश केला होता. परंतु, दिल्ली कॅपिटल्सने त्याला आयपीएल २०२५ साठी संघात समाविष्ट करण्यासाठी त्याच्या बेस प्राईसपेक्षा तिप्पट पैसे (६.२५ कोटी रुपये) खर्च केले. आयपीएल २०२५ च्या लिलावापूर्वी बीसीसीआयने स्पर्धेबाबत अनेक नियम बनवले होते. या काळात बोर्डाने स्पष्टपणे सांगितले होते की, जर लिलावात नोंदणी केल्यानंतर कोणत्याही खेळाडूची निवड झाली आणि यानंतर, जर त्याने हंगाम सुरू होण्यापूर्वी स्वतःला स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिले नाही आणि खेळण्यास नकार दिला, तर त्याला दोन हंगामांसाठी स्पर्धेत आणि लिलावात भाग घेण्यास बंदी घातली जाईल. आता बीसीसीआयने या नियमाबाबत कडक भूमिका घेतली आहे.
बीसीसीआयने ईसीबी आणि हॅरी ब्रूकला दिली बंदीची माहिती –
England Cricketer Harry Brook has been banned from playing in the IPL for the next two years after he withdrew himself after being selected in the auction: IPL Official
— ANI (@ANI) March 13, 2025
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने ईसीबी आणि हॅरी ब्रूकला २ वर्षांच्या बंदीबद्दल अधिकृतपणे माहिती दिली आहे. बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘बीसीसीआयने त्यांच्या धोरणानुसार, ब्रूकवरील दोन वर्षांच्या बंदीबाबत ईसीबी आणि ब्रूकला अधिकृत पत्र पाठवले आहे.’ गेल्या वर्षी आयपीएल लिलावासाठी नाव नोंदणी करण्यापूर्वी प्रत्येक खेळाडूला याची माहिती देण्यात आली होती. हे बोर्डाचे धोरण आहे आणि प्रत्येक खेळाडूला ते पाळावे लागेल.
हॅरी ब्रूकने सलग दुसऱ्यांदा असे केले –
विशेष म्हणजे हॅरी ब्रूकने अचानक आयपीएलमधून आपले नाव मागे घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. आयपीएल २०२४ च्या आधीही त्याने अशाच प्रकारे स्पर्धेत खेळण्यास नकार दिला होता. हे सलग दुसरे वर्ष आहे, जेव्हा ब्रुकने वैयक्तिक कारणांमुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे. मात्र, यावेळी ब्रुकने त्याच्या निर्णयाबद्दल माफीही मागितली आहे.
— Harry Brook (@Harry_Brook_88) March 9, 2025
२६ वर्षीय ब्रूकने त्याच्या या निर्णयाचे स्पष्टीकरण देणारे एक निवेदन जारी केले होते. तो म्हणाला, ‘मी खूप कठीण निर्णय घेतला आहे, ज्यासाठी मी दिल्ली कॅपिटल्स आणि त्यांच्या समर्थकांची माफी मागू इच्छितो.’ ब्रूक आयपीएल २०२३ मध्ये सनरायझर्स हैदराबादचा भाग होता. तिथे त्याने ११ सामन्यांमध्ये १९० धावा केल्या. एसआरएचने त्याला १३.२५ कोटी रुपयांना खरेदी केले होते.





