Indian Womens Team : विश्वविजेत्या भारतीय महिला संघाला BCCI कडून बक्षीस जाहीर! ICC पेक्षा जास्त देणार रक्कम

Indian Womens Team Prize Money : भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचत पहिल्यांदाच आयसीसी महिला वनडे विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी पराभूत केले. ज्यामुळे संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण आहे. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी यांच्यासाठी ५१ कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे. त्यांनी हे भारतीय महिला क्रिकेटसाठी मोठा क्षण असल्याचे म्हटले.
१९८३ च्या विश्वचषकाशी तुलना –
आयपीएल अध्यक्ष अरुण धूमल यांनी या विजयाची तुलना १९८३ मध्ये पुरुष संघाने जिंकलेल्या विश्वचषकाशी केली. ते म्हणाले की, आजचा दिवस महिला क्रिकेटच्या इतिहासात अविस्मरणीय ठरला आहे आणि आता महिला क्रिकेट नव्या उंची गाठेल.
महिला क्रिकेटसाठी अविस्मरणीय दिवस –
धूमल यांनी वृत्तसंस्था आयएएनएसशी बोलताना सांगितले की, हा भारतीय महिला क्रिकेटसाठी अविस्मरणीय दिवस आहे. पुरुष संघाने १९८३ मध्ये जे साधले ते भारतीय महिलांनी आज मुंबईत पुन्हा साकारले. हा ऐतिहासिक विजय देशातील महिला क्रिकेटला प्रचंड चालना देईल आणि मला विश्वास आहे की आमचा खेळ आता नव्या उंची गाठेल.
हेही वाचा – हरमनप्रीत भांगडा करत आली अन्…; जय शाहांकडून ट्रॉफी स्वीकारताना केलेल्या ‘त्या’ कृतेचे होतयं कौतुक
सामन्यात भारताची दमदार कामगिरी –
Let the celebrations go long into the night 🥳🙌
Put your hands together for the ICC Women’s Cricket World Cup 2025 winners – #TeamIndia 🇮🇳#WomenInBlue | #CWC25 | #INDvSA | #Champions pic.twitter.com/Gnnz6S3GRf
— BCCI Women (@BCCIWomen) November 2, 2025
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत २९८ धावा उभारल्या. शेफाली वर्मा हिने ८७ धावा, दीप्ती शर्मा हिने ५८ धावा आणि स्मृती मानधना हिने ४५ धावा केल्या. भारताच्या सलामी जोडीने १०० धावांची भागीदारी करून संघाला मजबूत सुरुवात दिली.
दीप्ती शर्माने घेतल्या पाच विकेट्स –
प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने चांगली सुरुवात केली, मात्र भारताने सातत्याने विकेट्स घेत सामना आपल्या बाजूने नेला. दीप्ती शर्मा हिने शानदार गोलंदाजी करत ५ विकेट्स घेतले. शफाली वर्मा हिनेही गोलंदाजीत कमाल करत २ विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्वार्ड हिने १०१ धावा केल्या, मात्र ती संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. त्यामुळे त्यांचा संघ २४६ धावांवर गारद झाला.
भारतीय महिला क्रिकेटमध्ये नव्या युगाची सुरुवात –
या विजयासह भारतीय महिला क्रिकेटमध्ये नव्या युगाची सुरुवात झाली आहे. खेळाडूंच्या डोळ्यात आनंदाश्रू होते आणि देशाचा तिरंगा अभिमानाने फडकत होता. भारताने विजेतेपद पटकावून इतिहास घडवला तसेच विक्रमी बक्षिस रक्कमही मिळवली. आयसीसीकडून महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या विजेता संघाला ४१.७७ कोटी रुपये बक्षिस देण्यात आले. तर उपविजेता दक्षिण आफ्रिकेला २१.८८ कोटी रुपये देण्यात आले. ही आतापर्यंतची सर्वात मोठी बक्षिस रक्कम आहे, जी महिला क्रिकेटमधील वाढत्या मान-सन्मान आणि लोकप्रियतेचे द्योतक आहे.





