पुणे | बीबीए, बीसीए अभ्यासक्रमाची मान्यता “एआयसीटीई’ देणार

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून (एआयसीटीई) बीबीए, बीसीए अभ्यासक्रम चालवण्यासाठीची मान्यता दिली जाणार आहे. मात्र या अभ्यासक्रमातील स्पेशलायझेशन, तुकडीची प्रवेश क्षमता याबाबतची मान्यता विद्यापीठ स्तरावरच होणार असल्याचे “एआयसीटीई’ने स्पष्ट केले आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून “एआयसीटीई’मार्फत बीबीए, बीएमएस, बीसीए अभ्यासक्रमांची मान्यता प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने बीबीए, बीएमएस, बीसीए अभ्यासक्रमांचे नामाभिधान बदलू इच्छित असल्यासंदर्भात विद्यापीठे, महाविद्यालयांकडून निवेदने देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर या संदर्भातील स्पष्टीकरण एआयसीटीईकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आले.
विषयाचे स्पेशलायझेशन नवे तंत्रज्ञान, नव्या क्षेत्रांच्या उदयांच्या अनुषंगाने बदलत असते. एआयसीटीईकडून केवळ बीबीए, बीएमएस, बीसीए अभ्यासक्रम राबवण्यासाठीची मान्यता देण्यात येत आहे. त्यामुळे अभ्यासक्रमांतील स्पेशलायझेशन, मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांसाठीच्या जागांबाबतची मान्यता प्रक्रिया संस्थांच्या विनंतीनुसार विद्यापीठाच्या स्तरावर राबवली जाणार आहे.
मान्यता देताना त्या विषयांच्या स्पेशलायझेशनचा अभ्यासक्रम विद्यापीठांकडून तयार करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले. एखाद्या संस्थेत बीबीए अभ्यासक्रमासाठी १२० जागांना एआयसीटीईने मान्यता दिली असल्यास विद्यापीठाकडून बीबीए रिटेल मॅनेजमेंटसाठी ६०, बीबीए एचआरसाठी ३० जागा, बीबीए मार्केटिंगसाठी ३० जागा अशा प्रकारे मान्यता देऊ शकते, असे स्पष्ट करण्यात आले.




