Pune : भूमिपूजनावरून श्रेयवादाची लढाई; महापालिकेकडून थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, काय आहे प्रकरण?

Pune News : पुण्यातील बाणेर येथे टाटा ग्रृपच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व निधीतून कौशल्यविकास केंद्र प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी १६५ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. प्रकल्पासाठी पुणे महापालिकेने जागा दिली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून दरवर्षी अंदाजे सात हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले आहे. मात्र, प्रकल्पाच्या भूमिपूजनावरून दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.
प्रकल्पाच्या उद्धघाटनसाठी दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी एकलाच बोलवावे अशी भूमिका दोन्ही पक्षाच्या वतीने घेण्यात आली होती. यामुळे महापालिकेची मोठी पंचाईत झाली होती. यावर आता भूमिपूजनासाठी वेळ द्यावा, अशी विनंती करणारे पत्र महापालिकेने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवल्याने याची जोरदार चर्चा केली जात आहे. महापालिकेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भूमिपूजनासाठी वेळ द्यावी अशी विनंती पत्राद्वारे केली आहे. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र पाठविले आहे.
यामुळे मुख्यमंत्री फडणवीस हे उद्घाटनासाठी आल्यास दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणाचीही नाराजी अधिकाऱ्यांना सहन करावी लागू नये, यासाठी हे पत्र देण्यात आल्याची चर्चा केली जात आहे. टाटा टेक्नोलॅाजी लिमिटेड या संस्थेमार्फत या प्रशिक्षण केंद्राची उभारणी केली जाणार आहे. या प्रशिक्षण केंद्रातून अभियांत्रिकी, तंत्रनिकेत, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील तांत्रिक कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.





