पुणे जिल्हा | जेजुरी गडाच्या पायश्याशी घाणीचे बस्तान

जेजुरी, (वार्ताहर)- जेजुरी शहराच्या गडकोट पायथ्याशी असलेल्या अण्णाभाऊ साठेनगर येथे घाणीचे प्रचंड साम्राज्य झालेले आहे. महिला व पुरुषांच्या स्वच्छतागृहाची तसेच पाण्याच्या दगडी हौदाची अवस्था दयनीय झाली आहे.
याच घाणीच्या साम्राज्य असलेल्या पाण्यातच महिलांना कपडे धुवावे लागत असल्याने काही जणांना नायटा व खरूज आदी संसर्गजन्य साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव झाला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
नगरपालिका प्रशासनाने त्वरित या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवावी तसेच उभारण्यात आलेली नवीन स्वच्छतागृहे नागरिकांना खुली करावीत; अन्यथा सर्व कचरा संकलित करून नगरपालिकेसमोर नेण्यात येऊन आंदोलन केले जाईल, असा इशारा बहुजन हक्क परिषदेचे शहराध्यक्ष यशवंत दोडके यांनी दिला आहे.
जेजुरी शहराच्या सातारा नाका ते नंदीचौक या मार्गावर अण्णाभाऊ साठे नगर ही वसाहत असून आजूबाजूला पुजारी वर्गाची घरे असल्याने व देवदर्शनाला जाण्या येण्याचा मार्ग असल्याने या ठिकाणी भाविकांची नेहमीच वर्दळ असते. या मार्गावर महिला व पुरुषांचे स्वच्छतागृह असून स्वच्छतागृहांची दारे निखळलेली आहेत. आतील भांडी फुटलेली आहेत. परिसरात प्रचंड घाणीचे साम्राज्य आहे.
भटक्या प्राण्यांचा वावर या ठिकाणी आढळून येत आहे. नगरपालिका स्वच्छता विभागाचे या भागाकडे दुर्लक्ष झाले आहे. दगडी बांधणीचा पाण्याचा हौद असून यातील पाणी दुर्गंधीत झाले आहे.
मात्र, पर्याय नसल्याने याच पाण्याचा वापर कपडे धुण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे काही जणांना खरूज व नायटा या संसर्गजन्य आजाराची लागण झाली आहे. नगरपालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अन्यथा सर्व कचरा संकलित करून नगरपालिकेपुढे आंदोलन करण्याचा इशारा दोडके यांनी दिला आहे.
आरोग्य, बांधकाम विभागाचा कोडगेपणा
जेजुरीवासीयांना नागरी सुविधा देण्यात नगरपालिका प्रशासन व्यवस्था अपयशी ठरत आहे. अधिकारी वर्गाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. नागरिकांनी कितीही तक्रारी कार्यालयात केल्या तरी गुळमुळीत उत्तर देण्यात येते. एखाद्या नागरिकाने फारच फैलावर घेतले तर फक्त ऎकून घेण्याची भूमिका वठवली जाते. नगरपालिका कर्मचारी, अधिकारी वर्गावर नाराजी व्यक्त होत आहे.





