प्रभात वृत्तससेवा सोमेश्वरनगर – श्रीसोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने चालू गाळप हंगामासाठी (२०२५-२६) शासनाच्या नियमानुसार निश्चित झालेल्या रास्त व किफायतशीर दरापेक्षा (एफ.आर.पी. रु. ३,२८५) अधिक, म्हणजेच प्रथम हप्त्यापोटी रु. ३,३०० प्रति मेट्रिक टन देण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी ही माहिती दिली. दि. १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान गळीतास आलेल्या ऊसाची प्रथम हप्त्याप्रमाणे देय असलेली रक्कम ऊस उत्पादक सभासदांच्या बँक खात्यावर दि. २९ नोव्हेंबर रोजी जमा करण्यात आली आहे. आतापर्यंत कारखान्याने ३,०१,७६० मे.टन गाळप पूर्ण करून ३,१४,९५० साखर पोत्यांचे उत्पादन घेतले असून, जिल्ह्यात उच्चांकी साखर उतारा कायम ठेवला आहे. यावेळी अध्यक्ष जगताप यांनी सांगितले की, प्रथम हप्त्याबाबत निर्णय उशिरा झाल्याने, शासनाच्या नियमानुसार १४ दिवसांच्या आत रक्कम जमा न झाल्यामुळे त्या कालावधीत गळीतास आलेल्या ऊसावर १५% व्याज देण्याचा निर्णय संचालक मंडळाने २५ नोव्हेंबर रोजी घेतला आहे.एकूण रु. १ कोटी २९ लाख इतकी व्याजाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. राज्यात एफ.आर.पी.वरील व्याज देणारा सोमेश्वर हा कदाचित एकमेव कारखाना असल्याचेही जगताप यांनी नमूद केले. यावर्षीदेखील एफ.आर.पी.पेक्षा जादा दर देण्याची परंपरा कायम ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.