Baramati News | डोर्लेवाडी न्यू स्कूलचा जागेचा प्रश्न मार्गी लागणार

प्रभात वृत्तसेवा
डोर्लेवाडी ( नवनाथ बोरकर ) – रयत शिक्षण संस्थेच्या बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूल डोर्लेवाडी शाळेची जागा व इमारती संदर्भातील प्रश्न मार्गी लावण्याचे स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर तालुक्यातील भवानीनगर (दि. 27) रोजी शेतकरी मेळाव्यादरम्यान छत्रपती सहकारी साखर कारखाना प्रशासनाला दिले आहेत. यामुळे छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व संचालक मंडळ याबाबत गतिमान होणार का आणि इमारत आणि जागेचा प्रश्न सोडवणार काय, याकडे डोर्लेवाडी, झारगडवाडी गावातील विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले आहे.
रयत शिक्षण संस्थेची इमारत जीर्ण व धोकादायक बनली आहे. याबाबत ऑडिटरने देखील कशा पद्धतीचा रिपोर्ट सात वर्षांपूर्वी दिला आहे. अनेक दिवसापासून शाळा जीर्ण व धोकादायक झाल्याने नवीन इमारत बांधून मिळण्याबाबत ग्रामस्थांचे प्रयत्न अनेक वर्षापासून सुरू आहेत त्याला यश मिळाल्याने ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन देखील केले.
न्यू इंग्लिश स्कूल डोर्लेवाडी माध्यमिक विद्यालय कारखान्याच्या मालकीच्या इमारतीमध्ये मागील पन्नास वर्षापासून सुरू आहे. दरम्यान, शाळेची इमारत जीर्ण व धोकादायक झाल्याने ती बांधून मिळावी, अशी मागणी सात ते आठ वर्षापासून ग्रामस्थ रयत शिक्षण संस्था व कारखान्याकडे करत होते. मात्र, याबाबत ठोस भूमिका घेतली जात नव्हती. 2022 मध्ये छत्रपतीच्या सर्वसाधारण सभेमध्ये कारखान्याकडे असणारे जागा ग्रामपंचायत देण्याबाबत ठराव केला होता.
त्यानुसार दस्ताची शासकीय रक्कमही ग्रामपंचायतने मार्च 2025 मध्ये जमा केली होती मात्र ऐनवेळी खरेदी दस्तावर सह्या करण्यासाठी तत्कालीन संचालक मंडळातील अधिकारी व पदाधिकारी आले नसल्यामुळे जागेचा व इमारतीचा प्रश्न प्रलंबित राहिला होता. याबाबत विविध संस्था संघटनेचे व पक्षाचे पदाधिकारी यांनी नूतन संचालक मंडळ यांना जागेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लेखी निवेदन देऊन विनंती केली होती. मात्र, संचालक मंडळ कोणताही ठोस निर्णय घेतला नाही.
इमारत व जागेची मालकी सध्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याकडे आहे. त्यामुळे इमारत बांधण्यासाठी रयत शिक्षण संस्थेला अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे जागेची मालकी रयत शिक्षण संस्थेला मिळणे गरजेचे आहे. याबाबत डोर्लेवाडी, झारगडवाडी गावातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.
डोर्लेवाडी, झारगडवाडीचे लक्ष वेधले..
उपमुख्यमंत्री पवार यांनी इंदापूर तालुक्यातील कारखान्याच्या वतीने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात डोर्लेवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेची इमारत आणि जागेसंदर्भात कारखान्याकडून असलेला प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे छत्रपती कारखान्याचे चेअरमन आणि संचालक मंडळ शाळेच्या इमारत आणि जागे संदर्भात गतिमान कधी होणार काय, हा प्रश्न उपस्थित होत आहे. डोर्लेवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूल डोर्लेवाडी च्या माध्यमिक विद्यालयाची नवीन इमारत कधीपर्यंत उभी राहणार याकडे डोर्लेवाडी झारगडवाडी येथील शिक्षण घेणारे विद्यार्थी व पालकांना आतुरता लागून राहिली आहे.





