बारामती (प्रतिनिधी) : गर्भवती महिलेच्या खून प्रकरणातील पती,सासू-सासरे व दिराची येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश के.एस.बकरे यांनी आरोपींची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.
बारामती शहरातील शिल्पा हेमंत पवार या गर्भवती विवाहितेचा दि. २२ मे २०१६ रोजी जाळून खुन केल्याबाबत सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पती हेमंत पवार, सासू-सुलोचना पवार, सासरे-संपत पवार, दिर-सिंद पवार यांनी 25 हजार रुपयाच्या हुंड्यासाठी शिल्पा पवार हिचा खून केला असल्याचा आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आला होता. मयत शिल्पा हिने उपचारादरम्यान दिलेल्या जबाबदावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर खटल्यामध्ये फिर्यादी पक्षाने एकूण ७ साक्षीदार तपासले, त्यामध्ये प्रत्यक्ष दर्शनी एक आठ वर्षाची मुलीची साक्ष देखील तपासली. सदर खटल्यामध्ये सरकारी पंच यांची देखील साक्ष झाली. रॉकेल टाकून जाळल्याबाबतचे मातीचे नमुने देखील हजर केले गेले होते. सदर खटल्यामध्ये पंचनामा आधी झालेला आहे व नंतर पंचांची नेमणूक केलेली असल्याचे निदर्शनास आले.
यावरून पंचनामा व इतर पुराव्यांवरती साशंकता निर्माण झाली. मयत शिल्पा गर्भवती असल्याची कोणतीही कागदपत्रे सादर झाली नाहीत. शिल्पा स्टोव्ह वरती स्वयंपाक करत होती व त्या स्टोव्ह चा भडका झाला व त्यामध्ये ती भाजली गेली, तिच्यावर सुसन रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही बाब आरोपीच्या वतीने करण्यात आलेल्या युक्तिवादात कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. साक्ष पुरावे व युक्तिवाद ग्राह्य धरत जिल्हा व सत्र न्यायाधीश के.एस.बकरे यांनी आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
आरोपी व दिर घटनेदिवशीपासून केसचा निकाल लागेपर्यंत कारागृहामध्ये होते. आरोपीच्या वतीने ॲड. प्रसाद भ. खारतुडे यांनी काम पाहिले. ॲड. उषा खैरे, ॲड. प्रिती शिंदे, ॲड. संतोष येडे (पळसदेवकर), ॲड. अनिश शिंदे यांनी सहाय्य केले.