Baramati Cyber Crime: पोलिसाच्या वर्दीत व्हिडिओ कॉल अन् ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती; बारामतीत वृद्ध महिलेची 45 लाखांची फसवणूक
Baramati Cyber Crime: अशी फसवणूक झाल्यास तत्काळ १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा आणि जवळच्या पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष जाऊन तक्रार नोंदवावी. गुन्हा घडल्यानंतर लवकरात लवकर तक्रार दिल्यास संबंधित बँक खाती गोठवून (Freeze) रक्कम वाचवणे शक्य होऊ शकते.

Baramati Cyber Crime: पोलिसाच्या गणवेशात व्हिडिओ कॉल करून ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत बारामती तालुक्यातील एका ७४ वर्षीय वृद्ध महिलेची तब्बल ₹४५ लाख ६० हजार रुपयांची सायबर फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डोरलेवाडी (ता. बारामती) येथील शकुंतला उद्धव खर्डे या महिलेने बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
असा रचला फसवणुकीचा सापळा –
१४ ते २७ फेब्रुवारी दरम्यान एका अनोळखी इसमाने शकुंतला खर्डे यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅपद्वारे व्हिडिओ कॉल केला. त्याने स्वतःला “संदीप पाटील” नावाचा पोलीस अधिकारी असल्याचे सांगत पोलिसाच्या गणवेशात कॉल केला. विश्वास संपादन केल्यानंतर त्याने शकुंतला यांच्याविरुद्ध अटक वॉरंट असल्याचे सांगत लवकरच ‘डिजिटल अरेस्ट’ होईल असा मानसिक दबाव टाकला.
भीतीपोटी गांगरलेल्या शकुंतला यांना आरोपीने बँकेतील मुदत ठेवी (FD) मोडण्यास भाग पाडले आणि वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे वर्ग करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी ₹३४ लाख ६०,००० आणि ₹११ लाख असे एकूण ₹४५ लाख ६० हजार रुपये वेगवेगळ्या खात्यांवर हस्तांतरित केले. नंतर आरोपीशी संपर्क होईनासा झाल्यावर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
हेही वाचा – पुण्यात घरफोडी करणारा ‘गँगस्टर’ जेरबंद; 62 लाखांचे सोने-चांदीचे दागिने जप्त
गुन्हा दाखल-
बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१९ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(सी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन –
बारामती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून सूचना दिल्या आहेत. कोणी स्वतःला पोलीस, सीबीआय, ईडी, न्यायालय किंवा सरकारी अधिकारी सांगून फोन किंवा व्हिडिओ कॉलवर ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत असेल तर त्यावर अजिबात विश्वास ठेवू नये. कोणत्याही परिस्थितीत फोन किंवा व्हिडिओ कॉलवरून पैसे ट्रान्सफर करू नयेत. संशयास्पद लिंक, ओटीपी, बँक तपशील किंवा वैयक्तिक माहिती अज्ञात व्यक्तींना देऊ नये.
अशी फसवणूक झाल्यास तत्काळ १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा आणि जवळच्या पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष जाऊन तक्रार नोंदवावी. गुन्हा घडल्यानंतर लवकरात लवकर तक्रार दिल्यास संबंधित बँक खाती गोठवून (Freeze) रक्कम वाचवणे शक्य होऊ शकते.





