Baramati Crop Damage : २ रुपयांवरून ३४ रुपयांवर गेलेली केळी भुईसपाट; गारपिटीने शेतकऱ्याचे मोठे नुकसान
Baramati Crop Damage : बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा धुमाकूळ; केळी, डाळिंब, पेरू, ढोबळी मिरची आणि कोथिंबीर पिकांचे अतोनात नुकसान.

Baramati Crop Damage – रविवारी दुपारी बारामतीत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे तालुक्यातील वडगाव निंबाळकर, कोराळे बुद्रुक, थोपटेवाडी, मासाळवाडी, होळ, सदोबाची वाडी, सस्तेवाडी इत्यादी गावांमध्ये केळी, डाळिंब, पेरू, वांगी, आंबा, कोथिंबीर, ऊस व चारा पिके यांचे मोठ्या प्रमाणामध्ये अतोनात नुकसान झाले.
सोमवार, दि. १ रोजी कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे तज्ज्ञ, कृषी विभाग व महसूल विभागाचे अधिकारी यांनी संबंधित गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच शासनामार्फत पंचनाम्याचे काम अधिकाऱ्यांमार्फत चालू केले. वडगाव निंबाळकर येथील प्रगतिशील शेतकरी अभिषेक अनिलकुमार शहा यांची १० एकरवरील केळीची बाग गारपीट व वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झाली आहे.
युद्धामुळे मागील दोन महिने केळीचे दर 2 रुपये किलो झाले होते ते आता कोठे 34 रुपयापर्यंत गेले असतानाच निसर्गाच्या अवकृपेमुळे त्यांच्या तोंडाचा घास हिरावून घेतला. तसेच 6 एकरावरील पेरूच्या बागेस देखील याचा तडाखा बसला असून फळांचे नुकसान झाले आहे सध्या लाल पेरू 150 रु प्रतिकिलो दर मिळत आहे त्याची क्वालिटी कमी झाल्याने त्यास व्यापारी घेणार नाही.
सस्तेवाडी येथील नितीन कदम यांच्या एक एकरावरील ढोबळी मिरचीचे शेडनेट गारा व जोराच्या वाऱ्याने संपूर्णपणे कोलमडले असून पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांचा पहिला तोडा ६० रुपयाने गेला होता व त्यांना 40 टनापर्यंत उत्पादन अपेक्षित असताना सर्व नुकसान झाले. त्यांनी 40 ते 42 डिग्री सेल्सिअस तापमानात उत्कृष्ट पीक आणले होते. मात्र, ते आता मातीमोल झाले आहे. याच गावातील किशोर कदम यांची अर्ध्या एकर वरील काकडी आणि एक एकरवरील कोथिंबीर याचे देखील पूर्ण नुकसान झाले आहे.
कृषी विभागाच्या सूचना
पीक कालावधी संपलेल्या प्लॉटची स्वच्छता करून घ्यावी, वाफसा पाहून मशागत करावी व खरीप हंगाम लागवडीसाठी क्षेत्र तयार करून ठेवावे. सध्याच्या उपलब्ध हवामान अंदाजानुसार पुढील ३ ते ४ दिवसांमध्ये मेघगर्जना व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. सगळ्यात महत्वाचे – आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांनी त्वरित झालेल्या नुकसानाची माहिती, फोटो काढून विमा अधिकाऱ्यास, कृषी विभागास कळविणे महत्वाचे आहे.





