Baramati Crime: एमआयडीसी रोड परिसरात रस्त्याच्या कडेला सुरू असलेल्या ‘ओपन बार’च्या प्रकारावर बारामती तालुका पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी धडक कारवाई करत बेकायदा व्यवसायांना आळा घातला. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून चौघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वैभव वाईन्सच्या शेजारील परिसरात काही टपऱ्यांमधून मद्यपानासाठी आवश्यक साहित्य पुरवून ग्राहकांना रस्त्यालगतच बसून दारू पिण्यास प्रवृत्त केले जात होते. त्यामुळे येथे ‘ओपन बार’चा प्रकार उघडपणे सुरू होता. परिणामी, मद्यपींची वर्दळ वाढून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. पोलिसांनी सायंकाळी ७ ते ९.३० दरम्यान पेट्रोलिंग करत कारवाई केली. यावेळी संतोष शहा (गुड्डू पान शॉप) व अशोक लोंढे (टी टपरी चालक) हे मद्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ग्लास, पाणी आदी साहित्य विकत देत असल्याचे आढळले. तसेच त्यांना त्याच ठिकाणी बसून मद्यपान करण्यास प्रोत्साहन दिले जात होते. दरम्यान, अशिष वाल्मिकी (अंडा भुर्जी टपरी) व नौशाद मुलानी (नूर चिकन सेंटर) हेही परवान्याविना व्यवसाय करत असल्याचे उघड झाले. संबंधितांकडून कचरा रस्त्यावर टाकून परिसर अस्वच्छ केल्याचेही निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून संबंधितांची वाहने व साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच वैभव वाईन्सलाही लेखी नोटीस बजावण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम व त्यांच्या पथकाने केली. या कारवाईनंतर एमआयडीसी परिसरातील बेकायदा धंदे करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.