Baramati By Election : बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार निश्चित? ‘हा’ नेता देणार सुनेत्रा पवारांना टक्कर
अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघ (Baramati By Election) रिक्त झाला असून, या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

Baramati By Election : अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघ (Baramati By Election) रिक्त झाला असून, या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उमेदवार म्हणून लढण्याची तयारी सुरू आहे, तर काँग्रेस पक्षानेही या मतदारसंघात स्वतंत्र उमेदवार देण्याच्या हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस बारामतीतून (Baramati By Election) आकाश मोरे यांना उमेदवारी देण्याच्या दिशेने विचार करत आहे. पक्षाकडून आकाश मोरे यांच्याशी निवडणूक लढवण्याबाबत चर्चा आणि विचारणा करण्यात आल्याचे समजते. आकाश मोरे यांना पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून मैदानात उतरवण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
बारामती (Baramati By Election) हा पारंपरिकपणे पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. अजित पवार यांनी येथून सलग अनेक वर्षे निवडणूक जिंकली होती आणि हा मतदारसंघ त्यांच्या राजकीय वर्चस्वासाठी ओळखला जायचा. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याने, काँग्रेसने स्वतंत्र उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्यास मतदारसंघात रस्सीखेच वाढणार आहे.
सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात बारामती पोटनिवडणूक ही चर्चेचा विषय बनली आहे. सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला महायुतीकडून पाठिंबा असल्याचे संकेत मिळत असले तरी, काँग्रेसने आकाश मोरे यांच्यासारख्या उमेदवाराद्वारे आव्हान उभे करण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे पारंपरिक पवार परिवाराच्या प्रभावक्षेत्रात प्रथमच मोठी राजकीय स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे.
पोटनिवडणुकीच्या (Baramati By Election) पार्श्वभूमीवर सर्व पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असून, मतदारसंघातील राजकीय समीकरणे कशी बदलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसच्या या हालचालींमुळे बारामतीत निवडणुकीची चुरस अधिक रंगदार होणार असल्याचे दिसते.






