Baramati News : बारामती विमानतळाच्या विकासासाठी ६४.५३ कोटींचा निधी मंजूर
Baramati News : तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती विमानतळाजवळ झालेल्या दुर्दैवी विमान अपघाताला १० महिने पूर्ण झाल्यानंतर, आता राज्य सरकारने या विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठी मोठे पाऊल उचलले आहे.

Baramati News : तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती विमानतळाजवळ झालेल्या दुर्दैवी विमान अपघाताला १० महिने पूर्ण झाल्यानंतर, आता राज्य सरकारने या विमानतळावर रात्रीच्या वेळी आणि सर्व प्रकारच्या हवामानात विमाने उतरण्यासाठी आवश्यक सोयीसुविधा उभारण्यासाठी ६४.५३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. (Baramati News)
दरम्यान, सरकारच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी देर आये दुरुस्त आये अशी प्रतिक्रिया दिली. हा निधी जर आधीच मिळाला असता, तर कदाचित दादा आज आपल्यात असते, अशा भावनिक शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (Baramati News)
सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. यामध्ये विमानतळाच्या दैनंदिन कामकाजासाठी आणि कर्मचारी वर्गासाठी वार्षिक ६८.८८ लाख रुपयांच्या आवर्ती खर्चासही मान्यता देण्यात आली आहे. (Baramati News)
गेल्या २८ जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती हवाई पट्टीजवळ लिअरजेट ४५ हे विमान कोसळून झालेल्या अपघातात तत्कालीन उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. (Baramati News)
या पार्श्वभूमीवर हे विमानतळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आले होते. निधीच्या प्रस्तावास मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने २९ ऑक्टोबर रोजी मंजुरी दिली होती. (Baramati News)
निधीचे नियोजन आणि प्रमुख कामे (६४.५३ कोटी रुपये) :
अग्निशमन यंत्रणा: १०,००० लिटर क्षमतेचे अग्निशमन वाहन (फायर क्रॅश फोम टेंडर) खरेदी करण्यासाठी १२ कोटी रुपये.
धावपट्टी सुधारणा: धावपट्टीचे सपाटीकरण, ब्लास्ट पॅड आणि पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी १०.५६ कोटी रुपये.
नेव्हिगेशन आणि प्रकाशयोजना: प्रिसिजन अप्रोच पाथ इंडिकेटर, धावपट्टीवरील दिवे आणि विंडसॉक्ससाठी ६ कोटी रुपये.
पायाभूत सुविधा: ८ किमी लांबीच्या परिघीय रस्त्यासाठी ५.४० कोटी रुपये आणि संरक्षक भिंतीसाठी ५.०६ कोटी रुपये.
एटीसी टॉवर आणि धावपट्टी डांबरीकरण: प्रीफॅब्रिकेटेड एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर व अग्निशमन केंद्रासाठी ५ कोटी रुपये, १,६०० मीटर धावपट्टीच्या डांबरीकरणासाठी ४.६१ कोटी रुपये आणि रनवे एंड सेफ्टी एरिया उभारण्यासाठी २.२७ कोटी रुपये.
इतर खर्च: जीएसटी, सल्लागार शुल्क आणि विम्यासाठी ९.५२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मनुष्यबळ आणि देखभाल
वार्षिक ६८.८८ लाख रुपयांच्या निधीतून वीज-पाणी खर्च आणि कंत्राटी पद्धतीने २१ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये टर्मिनल मॅनेजर, एअरसाइड मॅनेजर, सुपरवायझर, सुरक्षा रक्षक, अग्निशमन दल जवान आणि देखभाल कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. या निधीचे नियंत्रण आणि वितरण प्राधिकरणाचे अधिकार मुंबईतील विमानचालन संचालनालयाकडे सोपवण्यात आले आहेत. (Baramati News)





