बारामती – २६ जानेवारी रोजी मराठा आरक्षणासाठी सुरू होणाऱ्या आमरण उपोषणासंदर्भात मराठा क्रांती मोर्चा बारामतीत तयारी सुरु असून सुमारे दीड हजार वाहने मुंबईकडे रवाना होतील, असे बारामती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. मराठा क्रांती मोर्चा बारामती यांच्या वतीने संपूर्ण बारामती तालुक्यातील समाजास जाहीर आवाहन करण्यात आले आहे की, २६ जानेवारीला आझाद मैदान मुंबई येथे मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकरिता आमरण उपोषण करणार आहेत. मनोज जरांगे पाटील करीत असलेल्या आमरण उपोषणासाठी, त्यांना साथ देण्यासाठी बारामती तालुक्यातील प्रत्येक गावातून वाडी वस्तीवरून दहा ते बारा चार चाकी वाहने व सामानासाठी एक ट्रॅक्टर किंवा एक टेम्पो अशी प्रत्येक गावाची एक तयारी राहील. बारामती तालुक्यातून एकूण एक ते दीड हजार चार चाकी वाहने व सामानाचे टेम्पो २४ जानेवारी रोजी सकाळी ०७.०० वाजता शिवाजी उद्यान, कसबा, बारामती येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोरगावच्या दिशेने निघतील. मोरगाव मध्ये मोरगावचे आजूबाजूच्या गावातील समाजबांधव सकाळी ०८.०० वाजता एकत्र जमतील व त्यांचेसह संपूर्ण बारामती तालुक्यातील समाज बांधव पुण्याकडे कूच करत देहूरोड येथे पोहोचणार आहेत. आंदोलनासाठी येणाऱ्या बारामती तालुक्यातील सर्व समाज बांधवांच्या जेवणाची सर्व व्यवस्था ही मराठा क्रांती मोर्चा, बारामती यांच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यासोबत आंदोलनासाठी जाणाऱ्या समाज बांधवांसाठी वैद्यकीय प्रथमोपचार साहित्य सोबत घेण्यात येत आहे. आंदोलन हे मनोज जरांगे पाटील यांचे सूचनेप्रमाणे होणार असून ते शांततेच्या मार्गानेच होणार आहे. बारामती तालुक्यातील जे समाज बांधव आंदोलनासाठी येणार आहेत ते सर्वजण जरांगे पाटलांच्या आदेशाशिवाय आंदोलन ठिकाणापासून परत येणार नाहीत. आंदोलनाला निघाल्यापासून परत येईपर्यंत कोणीही कोणत्याही अफवांना बळी पडू नये. जोपर्यंत मनोज जरांगे पाटील स्वतः एखादी गोष्ट स्वतःच्या तोंडाने सांगत नाहीत तोपर्यंत कोणीही कुठल्याही निष्कर्षाला येवू नये, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या बारामती यांच्या वतीने करण्यात आले आहे.