#BappiLahiri : ‘बप्पी दा’ला असा मिळाला संगीत क्षेत्रात 19 व्या वर्षी पहिला ब्रेक…

मुंबई – प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचे निधन झाले आहे. मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६९ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून बप्पी लहिरी यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर मुंबईतील क्रिटी केअर या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
बप्पी लहिरी यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५३ झाला होता. १९७३ सालच्या ‘नन्हा शिकारी’ या चित्रपटाद्वारे बप्पी लहिरी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पण त्यांना खऱ्या अर्थाने यश मिळायला १९८२ साल उजाडावे लागले. १९८२ मध्ये आलेल्या मिथुन चक्रवर्ती यांच्या ‘डिस्को डान्सर’ या चित्रपटामुळे बप्पी लहिरी प्रकाशझोतात आले. त्यानंतर बप्पी लहरी यांनी अनेक चित्रपटांमध्ये गायक आणि संगीतकार म्हणून काम केले.
संगीत क्षेत्रात वयाच्या १९ व्या वर्षी बप्पीदा यांना पहिला ब्रेक मिळाला. ते कोलकत्ता सोडून मुंबईला आले होते. बप्पी लहिरी यांनी आपल्या आई वडिलांनी गायिलेल्या ‘नन्हा शिकारी’ या गाण्याला १९७२ मध्ये संगीत दिलं होतं. याआधी त्यांनी एका बंगाली चित्रपटात गाणंसुद्धा म्हटलं आहे. परंतु त्यांना खरी ओळख ‘जखमी’ या चित्रपटातील गाण्यांमुळे मिळाली होती. १९७५ मध्ये आलेल्या या चित्रपटात बप्पीदांनी मामा किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांच्यासोबत गाणं गायिलं होतं.





