Satara: जल्लोषी वातावरणात बाप्पांचे आगमन
Satara घरोघरी गणेशमूर्तींची विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सार्वजनिक मंडळांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका काढून बाप्पांना मंडपात विराजमान केले.

Satara: ढोलताशांचा गजर, लेझीमच्या तालावर थिरकणारी तरुणाई, फुलांची उधळण, ‘गणपतीबाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष अशा जल्लोषी वातावरणात शाहूनगरीमध्ये श्री गणरायाचे आगमन झाले. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सोमवारी लाडक्या बाप्पांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. घरोघरी गणेशमूर्तींची विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सार्वजनिक मंडळांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका काढून बाप्पांना मंडपात विराजमान केले.
जिल्ह्यात यंदा दोन लाख 39 हजार 422 घरगुती आणि पाच हजार 276 सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. विशेष म्हणजे 574 गावांनी ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेचा स्वीकार करून सामाजिक एकतेचा संदेश दिला आहे. गणेश चतुर्थीला पहाटेपासूनच शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. घरोघरी गणरायाच्या प्रतिष्ठापनेची लगबग सुरू होती. पुरोहितांनी केलेल्या मंत्रघोषात पूजा करुन, गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. बाप्पाला दूर्वा, फुले, हार अर्पण करून आणि मोदकांचा नैवेद्य दाखवून, आरती करण्यात आली. दुपारी 1 वाजून 54 मिनिटांपर्यंतच्या शुभमुहूर्तात अनेक घरांमध्ये गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना झाली.
शहरातील मानाच्या गणेश मंडळांनीही उत्साहात बाप्पाचे स्वागत केले. सदाशिव पेठेतील मानाच्या सम्राट गणेश मंडळाच्या महागणपतीची प्रतिष्ठापना टंकसाळे व खुटाळे यांच्या हस्ते झाली. शेटे चौकातील 87 वर्षांची परंपरा असलेल्या श्री प्रकाश गणेशोत्सव मंडळाने पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे. फुटका तलाव मंडळाने पाण्यातील तराफ्यावर गणरायाची मिरवणूक काढली, तर सोमवार पेठेतील माने परिवाराने राजहंसावर विराजमान बाप्पाची मिरवणूक काढून लक्ष वेधले.
पूजा साहित्य, फुले, दूर्वा, मोदक आणि सजावटीच्या साहित्याच्या खरेदीसाठी राजवाडा, मोती चौक, पोवई नाका, बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथील बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी झाली. त्यामुळे प्रमुख मार्गांवरील वाहतूक संथ झाली होती. उत्सवात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलिस व होमगार्डचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यंदाचा गणेशोत्सव पुढील बारा दिवस भक्ती, उत्साह आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगणार असून, गौरी आगमनाची तयारीही सुरू झाली आहे.





