विलीनीकरणाविरोधात अधिकारी संप करणार
5 दिवसांचा आठवडा करण्याचीही मागणी
पुणे – सरकारी बॅंकांच्या विलीनीकरणाला अधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. या आणि इतर मागण्यांसाठी बॅंक अधिकाऱ्यांच्या संघटना पुढील आठवड्यात संप करणार आहेत. त्यामुळे कामकाज विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
ऑल इंडिया बॅंक ऑफिसर्स कॉन्फडरेशन या अधिकाऱ्यांच्या संघटनेने दि.26 आणि 27 सप्टेंबर रोजी संपाचे आवाहन केले आहे. बॅंकांचे विलीनीकरण देशासाठी अयोग्य आहे. त्याचबरोबर यामुळे ग्राहकांचाही फायदा होणार नाही, असा युक्तिवाद या संघटनेने केला आहे. 30 ऑगस्टपूर्वी देशामध्ये 27 सरकारी बॅंका होत्या. आता ही संख्या 12 होणार आहे. सरकारी बॅंकांनी गोरगरिबांना तसेच खेड्यापाड्यातील जनतेला सेवा दिली आहे. देशातील सध्याची परिस्थिती पाहता सरकारी बॅंका आहे त्या अवस्थेत काम करणे गरजेचे आहे, असे अधिकाऱ्यांच्या संघटनेचे म्हणणे आहे.
दि.26 आणि 27 सप्टेंबर हे दिवस गुरुवार आणि शुक्रवार आहेत. त्यानंतर शनिवार आणि रविवारची सुट्टी येते. त्याचबरोबर नंतर गांधी जयंती येते. या कारणामुळे बरेच दिवस कामकाजावर परिणाम होणार आहे. विलीनीकरणाच्या विरोधाशिवाय अधिकाऱ्यांनी इतरही काही मागण्या केल्या आहेत. त्यानुसार कामाचे दिवस आठवड्यात 5 दिवस असावेत. रोखीच्या व्यवहाराचा कालावधी कमी करण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्यांना इंडियन नॅशनल बॅंक ऑफिसर्स असो., इंडियन नॅशनल बॅंक एम्प्लॉईज असोसिएशन, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बॅंक ऑफिसर्स या संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. जर सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष करून विलीनीकरणाचा कार्यक्रम पुढे नेला, तर नोव्हेंबरमध्ये बेमुदत संप करण्याचा इशारा देण्यात आला आहे.