बँक निफ्टी नव्या विक्रमी पातळीवर; रेपो आणि सीआरआर कमी झाल्याचा परिणाम

नवी दिल्ली – रिझर्व बँकेने आपल्या रेपो या मुख्य व्याजदरात तब्बल अर्धा टक्के कपात केली. त्याचबरोबर रोख राखीव प्रमाणात अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजे एक टक्क्याची कपात केली. यामुळे बँकांना वापरासाठी अडीच लाख कोटी रुपये मिळणार आहेत. या कारणामुळे बँकांच्या शेअरची जोरदार खरेदी होऊन बँक निफ्टी विक्रमी पातळीवर गेला.
रिझर्व बँकेने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की,29 नोव्हेंबरपर्यंत चार समान हप्त्यात रोख राखीव प्रमाण म्हणजे सीआरआर एक टक्क्याने कमी केला जाईल. त्यानंतर सीआरआर केवळ तीन टक्के होणार आहे. म्हणजे बँकांना त्यांच्याकडे आलेल्या ठेवीच्या केवळ तीन टक्के रक्कम रिझर्व बँकेकडे ठेवावी लागणार आहे.
रिझर्व बँकेच्या या घोषणेनंतर बँकांच्या शेअरच्या भावावर आधारित बँक निफ्टी एकाच दिवसात 1.47 टक्क्यांनी म्हणजे 817 अंकांनी वाढून 56,578 अंकावर गेला. एक वेळ हा निर्देशांक 56,695 अंकापर्यंत वाढला होता. विश्लेषकांनी सांगितले की, व्याजदर कमी झाल्यामुळे आणि सीआरआर कमी झाल्यामुळे बँकांचा कर्ज पुरवठा वाढणार आहे. त्याचबरोबर बँकाचा नफा वाढणार आहे. या कारणामुळे बर्याच गुंतवणूकदारांनी बँकांच्या शेअरची मोठ्या प्रमाणात खरेदी केली.
केवळ बँकांच्या शेअरची आज जास्त खरेदी झाली नाही तर व्याजदराशी संबंधित इतर रिअल इस्टेट, वाहन, ग्राहक वस्तू इत्यादी क्षेत्राच्या कंपन्यांच्या शेअरच्या भावातही वाढ झाली असे जियोजित वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले. गेल्या काही महिन्यापासून बँकांचा कर्ज पुरवठा कमी होत होता. तो कर्जपुरवठा आता वाढण्यास मदत होणार आहे. बँकांना कमी व्याजदरावर ठेवी आकर्षित करण्यात अडचणी येत होत्या. आता ही तूट सीआरआर कमी केल्यामुळे काही प्रमाणात भरून निघू शकणार आहे.
मुख्य निर्देशांकात एक टक्का वाढ –
व्याजदर कमी होणार असल्यामुळे आणि रोख राखीव प्रमाण कमी होणार असल्यामुळे सर्वच क्षेत्रांचा भांडवल पुरवठा वाढणार आहे. अशा परिस्थितीत बहुतांश क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची जोरदार खरेदी झाली. यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 746 अंकांनी वाढून 82,188 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 1 टक्क्याने वाढून 25,003 अंकावर बंद झाला. इंडस्ट्रियल्स आणि भांडवली वस्तू वगळता इतर सर्व क्षेत्राचे निर्देशांक वाढले.





