बॅंक कर्मचारी जाणार संपावर; काय आहेत मागण्या? जाणून घ्या…

नवी दिल्ली – सरकारी बँक कर्मचार्यांच्या संघटनांनी 24 व 25 मार्च रोजी दोन दिवसाचा संप करण्याचे ठरविले आहे. यासंदर्भात कर्मचार्यांच्या संघटनांनी बँकांकडे तशी नोटीस पाठविली आहे. कर्मचार्यांनी आपल्या विविध मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी संप करणार असल्याचे सांगितले आहे. या मागण्यांमध्ये कर्मचारी भरती वाढवावी आणि कामाचा आठवडा पाच दिवसांचा करावा या मागण्यांचा समावेश आहे.
नऊ बँकांच्या कर्मचार्यांचा समावेश असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन या संघटनेने ही नोटीस दिली आहे. सरकारी बँकांच्या संचालक मंडळावर कर्मचार्यांचे प्रतिनिधी घेतले जावेत अशीही कर्मचार्यांची मागणी आहे. या विषयावर सरकारबरोबर आणि बँक व्यवस्थापनाबरोबर चर्चा होऊनही यातून मार्ग निघत नसल्यामुळे दोन दिवस संप करावा लागत असल्याचे या संघटनेने म्हटले आहे.
अर्थ मंत्रालयातील वित्तीय सेवा विभागाने जास्त काम करणार्या कर्मचार्यांना जास्त पगार आणि इतर सवलती देण्याचे पत्रक प्रसिद्ध केले आहे. हे पत्रक परत घेतले जावे. कारण यामुळे कर्मचार्यांमध्ये मतभेद निर्माण होतील असे संघटनेचे म्हणणे आहे.
सरकारकडून बँकांच्या कामकाजात हस्तक्षेप केला जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. व्यवस्थापनाबाबत बँकांना स्वायत्तता असावी असे म्हटले आहे. या या अगोदर बँकांनी 24 व 25 फेब्रुवारी रोजी संप करण्याचे जाहीर केले होते. मात्र इतर कर्मचारी संघटनांबरोबर चर्चा केल्यानंतर आता ही तारीख बदलण्यात आली आहे.
कर्मचार्यांच्या मागण्या –
-कामाचा आठवडा पाच दिवसांचा करावा
-थांबलेली कर्मचारी भरती सुरू करावी
-कामाच्या मूल्यांकनाची पद्धत रद्द करावी
-सरकारचा बँकांच्या कामकाजात हस्तक्षेप नको





