Bangladesh: बांगलादेशच्या अंतरिम सरकारने ‘जमात-ए-इस्लामी’ पक्षावरील बंदी उठवली

ढाका – बांगलादेशातील हंगामी सरकारने जमात-ए-इस्लामी आणि या पक्षाशी संबंधित असलेल्या इस्लामी छात्र शिबीर या विद्यार्थी संघटनांवरील बंदी उठवली आहे. हंगामी सरकारच्या गृहमंत्रालयाने या संदर्भातील अधिसूचना आज लागू केली.
दहशतवाद आणि हिंसाचारात बांगलादेश जमात-ए-इस्लामी आणि तिची विद्यार्थी संघटना इस्लामी छात्रशिबिर यांचा सहभाग असल्याचा कोणताही ठोस पुरावा नसल्यामुळे आणि या संघटनेसह सर्व संलग्न संघटना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी नाहीत, असा सरकारचा विश्वास आहे. त्यामुळे या संघटनांवर पूर्वीच्या सरकारने घातलेली बंदी तात्काळ उठवण्यात येत आहे, असे जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये म्हटले गेले आहे.
दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत सरकारला असलेल्या अधिकाराद्वारे पूर्वीचे परिपत्रक रद्द केले आहे, असेही त्यात म्हटले आहे. या संघटनांबाबतचा निर्णय तात्काळ अंमलात येणार आहे.
यापूर्वी १ ऑगस्ट रोजी बांगलादेशातील आधीच्या अवामी लीगच्या नेतृत्वाखालील सरकारने जमात-ए-इस्लामी आणि इस्लामी छात्रशिबीर आणि त्याच्याशी संबंधित सर्व संघटनांवर दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत बंदी घातली होती.





