नोंद : हिल्सा माशांची चर्चा का…?

दरवर्षी दुर्गापूजेच्या काळात पद्मा नदीतील हिल्सा मासे बंगालला पोहोचत असत. पण यावेळी बांगलादेशच्या सरकारने माशांची राणी समजली जाणार्या हिल्साची निर्यात न करण्याचा निर्णय घेतला.
बंगाली नागरिकांसाठी हिल्सा हा एक केवळ मासा नसून एक सामाजिक आणि सांस्कृतिक अस्मिता आहे. त्यामुळेच गेल्यावर्षी दुर्गापूजेच्या काळात बांगलादेशच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना सरकारने 3 हजार 950 टन हिल्सा मासे कोलकात्याला पाठविले. हिल्सा हा बांगलादेशचा राष्ट्रीय मासा आहे. जगभरातील हिल्साच्या एकूण उत्पादनापैकी 70 टक्के उत्पादन बांगलादेशात होते. पद्मा नदीतील हिल्सा माशांची चव ही अन्य कोठेही मिळणार्या आणि आढळून येणार्या माशांत नसते. या कारणामुळेच दरवर्षी प्रामुख्याने दुर्गापूजेच्या काळात बंगालचे नागरिक सीमेपलीकडून येणार्या या माशाची आतुरतेने वाट पाहात असतात. हिल्साची किंमत आणि वजन ठरलेले असते. मोठा मासा असेल तर अधिक किंमत. सुमारे दोन हजार रुपये प्रति किलोपर्यंत भाव असूनही त्यास प्रचंड मागणी असते. बंगाली समुदायातील कोणताही धार्मिक कार्यक्रम असो किंवा सामाजिक उपक्रम या माशांशिवाय तो अपुरा असतो, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
निर्यातबंदी कशामुळे?
बांगलादेशच्या हंगामी सरकारने देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी यावर्षी भारताला हिल्साचा पुरवठा न करण्याचा निर्णय घेतला. मत्स्य पालन मंत्रालयाचे सल्लागार फरिदा अख्तर यांनी ढाक्यात यासंदर्भात घोषणा केली. त्यांनी म्हटले की, यावर्षी दुर्गापूजेच्या वेळी भारताला या माशांची निर्यात केली जाणार नाही. या निर्णयामुळे शेख हसीना यांनी सुरू केलेली परंपरा मोडीत निघाली आहे. हसीना सत्तेत असताना ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात सलोख्याच्या भावनेतून प्रचंड प्रमाणात हिल्साची निर्यात केली जात असे. पण बांगलादेश सरकारने आताचा घेतलेला निर्णय हा विचित्र असून त्याचे खरे कारण वेगळेच आहे. देशांतर्गत मागणी हे एक निमित्त असून बांगलादेशातील जनतेत भारताविरोधात असलेली भावना पाहता सरकारने या माशांची निर्यात न करण्याचा निर्णय घेतला. लोकांची भावना आणखी संतप्त होऊ नये आणि असंतोष वाढू नये यासाठी सरकारने भारताला मासे न पाठविण्याचा निर्णय घेतला.
ही पहिली वेळ नाही
बांगलादेशकडून या माशांच्या निर्यातंीवर बंदी घालण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2012 मध्ये देशातील मागणीचे कारण सांगून शेख हसीना सरकारनेही यावर निर्बंध आणले होते. तत्कालिन काळात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेमुळे बांगलादेशने मासे पाठवले नव्हते. त्यांनी तिस्ता पाण्यासंदर्भातील कराराला आक्षेप घेतला होता. यास प्रत्युत्तर देत बांगलादेशने हिल्साच्या निर्यातीवर बंदी घातली होती. ङ्गेब्रुवारी 2015 मध्ये बंदी हटविण्याचे आवाहन करण्यात आले. शेवटी सप्टेंबर 2020 मध्ये हसीना सरकारने निर्बंध मागे घेतले. सध्या दुर्गापूजेच्या वेळी त्यावर बंदी घातल्याने बंगालमधील नागरिक आणि व्यापार्यांचा हिरमोड झाला आहे. पेट्रोपोल येथील एक मासे आयातदार विभूती मंडल म्हणतात, हा निर्णय धक्कादायक आहे. आम्ही दरवर्षी उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात माशांची आयात करतो. पण आता बांगलादेशातून हिल्सा येणार नसल्याने आम्हाला ओडिशा आणि म्यानमारच्या हिल्सावर अवलंबून राहावे लागेल. कोलकता फिश इम्पोर्टस संघटनेचे सदस्य रंजन साहा म्हणाले, आम्हाला ओडिशा आणि म्यानमारधून तीस टक्के जादा भावाने हिल्साची आयात करावी लागत आहे. बांगलादेशमधून मासे न आल्याने त्याच्या भावात प्रचंड वाढ झाली आहे.
प्रामुख्याने बंगाली लोकांच्या मनात स्टेटस सिम्बॉलचा दर्जा मिळवलेल्या या माशांवरील प्रेम स्वातंत्र्यानंतर वाढले. यामागचे कारण म्हणजे तत्कालीन पूर्व बंगालमधून येणारे बंगाली निर्वासित. बंगाली हिंदू कुटुंबीय हिल्साशिवाय कोणतेही शुभकार्य करत नाहीत. मग विवाह असो किंवा पूजाअर्चा. बाजारात बांगलादेशातील हिल्साची आवक ही स्थानिक माध्यमांत नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. यावरून बंगालचे जनजीवन आणि समाजातील हिल्साचे स्थान लक्षात येते.
हिल्सा हा बंगालच्या उपसागरात आढळणारा मासा. परंतु समुद्री हिल्सा नदीप्रमाणे स्वादिष्ट नसतो. या ठिकाणी गंगा नदीतही हिल्सा आढळतो. परंतु बांगलदेशातील पद्मा नदीतील हिल्साची चव अनोखी मानली जाते. हा एक तेलकट मासा असून यात ओमेगा थ्री ङ्गॅटी अॅसिड भरपूर आहे. अन्य माशांप्रमाणे हिल्सा कट करून विकला जात नाही. खवय्ये आपल्या गरजेनुसार लहान मोठे मासे खरेदी करू शकतात. बंगालचे साहित्यिक मणिशंकर मुखर्जी म्हणतात, हिल्सा मासा ही एक बंगालच्या समाजातील स्टेटस सिम्बॉल आहे. मात्र भाव पाहता तो आवाक्याबाहेर गेला आहे.
महागड्या माशांचा जीव धोक्यात
ताज्या आणि थंड पाण्यात आढळणारा मासा हा सर्वात महाग मानला जातो. यामागचे कारण माशाचे अंडे आणि चव. पूर्व युरोपात बेकायदा शिकारीचे प्रमाण प्रचंड असल्याने या माशांच्या दोन प्रजाती विलुप्त झाल्या. आता चार प्रजाती धोक्यात आहेत. जर्मनीची डेन्यूब नदी बल्गेरिया, रुमानिया, युक्रेनमधून जाते. शेवटी ती काळ्या समुद्राला जाऊन मिळते. या भागात दुर्मिळ स्टर्जन माशांचे मोठे आगार आहेत. या भागात 2016 ते 2023 या काळात त्याची मोठ्या प्रमाणात तस्करी आणि शिकार झाल्याचे 395 प्रकरणे समोर आली आहेत. यात 1031 स्टर्जन मासे मृत्यूमुखी पडले.
बेकायदा शिकार आणि तस्करी
रुमानिया आणि बल्गेरिया येथे स्टर्जन माशाची शिकार करण्यासाठी चढाओढ सुरू असते. एका अहवालानुसार, बल्गेरियात सुमारे 37 किलोमीटरपर्यंतच्या भागात मासे पकडणारे एकूण 988 हुक जप्त केले. त्याचवेळी रुमानियात सर्वाधिक 610 स्टर्जन मासे शिकार्यांच्या जाळ्यात सापडले. डेन्यूब नदीत पूर्वी सहा प्रकारचे स्टर्जन मासे आढळून येत असत. आता दोन लुप्त झाले आहेत. एक पूर्ण वाढ झालेला स्टर्जन मासा 19 ते 250 किलो वजनाचा असू शकतो. त्याची लांबी सरासरी पाच ते दहा ङ्गुटादरम्यान असू शकते. मादी स्टर्जन बेलुगा, नर बेलुगाच्या तुलनेत 20 टक्के मोठी असते. डेन्यूब नदीत आढळणार्या चार स्टर्जन प्रजातीत बेलुगा माशालाच भक्षक म्हणून मानले गेले. ही प्रजाती साध्या माशांचे सेवन करते, परंतु कधी कधी ते लहानमोठे जलचर प्राण्यांचे देखील सेवन करतात.
स्टर्जन माशांचे अंडे
स्टर्जन माशांचे अंडे जगभरात चर्चेचा विषय आहेत. या अंड्यात जीवनसत्त्व बी 12, ओमेगा-3 फॅटी अॅसिड असते. अर्थात ही अंडी दोन ते चार लाख रुपये प्रति किलोच्या हिशेबाने विकण्याचे कारण केवळ पोषणच नाही, तर त्यावर केली जाणारी प्रक्रिया देखील कारणीभूत आहे. लुप्त होणार्या प्रजातीशी मिळतेजुळते असल्याने त्यांचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी आहे. स्टर्जन माशांचे अंडी परिपक्व होण्यासाठी वीस वर्षांपर्यंतचा काळ लागतो. याशिवाय अंडी परिपक्व करण्याचे बेकायदा कामही केले जाते. अंडी आणि मांस यामुळे जादा किमतीत विकल्या जाणार्या स्टर्जन माशांच्या शिकारीवर बल्गेरिया, मोल्डोवा, रुमानिया, सर्बिया आणि युक्रेनमध्ये बंदी आहे. काळा समुद्राच्या परिसरात काही देशांनी त्यावर कडक निर्बंध घातले आहेत. डेन्यूबचा खालचा भाग हा युरोपचा शेवटचा भाग. तेथे हे मासे प्रजनन करत असतात. युरोपात स्टर्जन माशांची संख्या प्रचंड वाढली असून त्याच्या संरक्षणासाठी आणखी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
वर्ल्ड वाइल्डलाइफच्या अहवालानुसार, बल्गेरिया, रुमानिया आणि युक्रेनमध्ये स्थानिक पोलीस किंवा संबंधित एजन्सीने तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांना तस्करी आणि बेकायदा विक्रीच्या प्रकरणात आरोपी ठरविले आहे. प्रशासनानुसार, अशा प्रकारची तस्करी काळा समुद्राबरोबरच किनारपट्टी भाग किंवा डेन्यूब नदी त्याचबरोबर देशातील अंतर्गत भागातही होते. खरे तर तस्करी आणि बेकायदा शिकारीचे खूपच कमी प्रकरणे समोर येतात. बल्गेरियाचा व्रातसा प्रांत, रुमानियातील टुलचा, युक्रेनचे ओडेसा प्रांत ही ठिकाणे बेकायदा कारभाराचे केंद्र आहेत. म्हणून हे रोखण्यासाठी सर्व देशातील संरक्षण सेवात आपापसात सहकार्य वाढविण्याची गरज आहे.
या नदीत जिवंत राहिलेल्या दुर्मिळ चार प्रकारच्या स्टर्जन माशांना ‘इंटरनॅशनल युनियन फाॅर कन्झर्व्हेशन आॅफ नेचर’च्या लाल यादीत सामील केले आहे. यापैकी तीन स्टेलेंट स्टर्जन, रशियन स्टर्जन आणि बेलुगा यांना गंभीर रूपाने लुप्तप्राय होणार्या प्रजातीत ठेवले आहे. त्याचवेळी स्टर्लेट र्स्टजनला देखील लुप्तप्राय प्रजातीच्या यादीत ठेवले आहे. डेन्यूबच्या खोर्यातील खालच्या भागात या चार दुर्मिळ प्रजाती आढळून येतात.





