#NZvBAN 3rd T20I : चार टॉप-5 फलंदाजांनी एकूण 4 धावा केल्या, तरीही न्यूझीलंडने जिंकला ‘असा’ सामना…

BAN vs NZ 3rd T20I : बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका अतिशय रोमांचकारी पद्धतीने संपली. माउंट मौनगानुई येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात बांगलादेशचा संघ अवघ्या 110 धावांत गारद झाला. प्रत्युत्तरात अवघ्या 49 धावसंख्येवर न्यूझीलंडचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. त्यानंतर जेम्स नीशम आणि मिचेल सँटनर यांनी 46 धावांची नाबाद भागीदारी करत किवी संघाला विजय मिळवून दिला.
Bangladesh Tour of New Zealand
Bangladesh 🆚New Zealand | 3rd T20INew Zealand won by 17 runs (DLS Method)#BCB | #Cricket | #NZvBAN pic.twitter.com/TFIZFNdWru
— Bangladesh Cricket (@BCBtigers) December 31, 2023
हा विजयही त्यांना पावसामुळे मिळाला. खरेतर, जेव्हा न्यूझीलंडला विजयासाठी 32 चेंडूत 16 धावांची गरज होती, तेव्हा पाऊस सुरू झाला आणि त्यानंतर डकवर्थ लुईस नियमाचा वापर करून निकाल काढावा लागला. येथे किवी संघाला 17 धावांनी विजयी घोषित करण्यात आले. अशाप्रकारे बांगलादेशने न्यूझीलंडमध्ये टी-20 मालिका जिंकण्याची संधी गमावली.
मिचेल सँटनरने घेतले चार बळी…
न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. किवी गोलंदाजांनी पहिल्याच षटकापासून विकेट्स घेण्यास सुरुवात केली. टीम सौदीने सामन्याच्या चौथ्या चेंडूवर सौम्या सरकारला (4) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर बांगलादेश संघ नियमित अंतराने विकेट गमावत राहिला. बांगलादेशचा रॉनी तालुकदार (10), कॅप्टन शांतो (17), तौहीद हदौई (16), अफिफ हुसैन (14), शमीम हुसेन (9), मेहदी हसन (4), रिशाद हुसेन (10), शोरीफुल इस्लाम (4), तनवीर इस्लाम (8) हे लहान खेळी खेळून बाद झाले. अशाप्रकारे बांगलादेशचा संपूर्ण संघ 19.2 षटकांत एकूण 110 धावांत गडगडला.
नीशम आणि सँटनरची मॅच विनिंग इनिंग…
111 धावांच्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंडची सुरुवातही खराब झाली. टीम सेफर्ट, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स आणि मार्क चॅपमन हे प्रत्येकी एक धाव करत पॅव्हेलियनमध्ये परतले. फिन ऍलनने 38 धावांची खेळी खेळली आणि काही काळ डाव सांभाळला, त्यानंतर तोही एकूण 49 धावा करून माघारी परतला. येथून नीशम (28) आणि सँटनर (18) यांनी नाबाद 46 धावा जोडत किवी संघाला विजयाच्या मार्गावर परतवले.
पावसामुळे सामना थांबला….
किवींनी 14.4 षटकात 5 गडी गमावून 95 धावा केल्या असताना पाऊस सुरू झाला आणि डकवर्थ लुईस नियमानुसार किवीसमोर नवे लक्ष्य ठेवण्यात आले . येथे न्यूझीलंडला 14.4 षटकांत 79 धावांचे लक्ष्य मिळाले, जे त्याने खूप आधी पार केले होते. अशा स्थितीत किवी संघाला 17 धावांनी विजयी घोषित करण्यात आले. मिचेल सँटनर ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरला. त्याने 4 विकेट्स घेतल्या आणि 18 धावांची इनिंग खेळली.
मालिका 1-1 ने बरोबरीत सुटली…
या विजयासह किवी संघाने तीन सामन्यांची टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. या मालिकेतील पहिला सामना बांगलादेशने जिंकला होता आणि दुसरा सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ हा पुरस्कार बांगलादेशच्या शरीफुल इस्लामला मिळाला. या मालिकेत त्याने एकूण 6 विकेट घेतल्या.





