बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांच्या अडचणीत वाढ, आणखी एक अटक वॉरंट जारी; आरोप काय?

ढाका- बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर आज नव्याने अटक वॉरंट बजावण्यात आले. त्यांच्याबरोबर त्यांचे पुत्र साजीब वाजेद आणि अन्य १६ जणांविरोधात देखील अटक वॉरंट बजावण्यात आले आहे.
राजधानी ढाकाजवळील पुर्बांचल न्यू टाऊनमधील रहिवासी भूखंड वितरणातील अनियमिततांच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणी ही वॉरंट बजावण्यात आली आहेत. या प्रकरणातील बहुतेक आरोपी सरकारी अधिकारी असल्याचे सरकारी वकिलांनी म्हटले आहे.
हसीना आणि अन्य आरोपींना अटक करण्यात आल्यास २९ एप्रिलपर्यंत त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
या प्रकरणाच्या तपास आणि अटकेच्या कार्यवाहीचा अहवाल देण्याचे पुढच्या सुनावणीपर्यंत आदेश न्यायालयाने ढाकामधील डझनभर आणि देशातल्या अन्य भागातल्या पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. हसीना आणि अन्य सर्व आरोपी फरार असल्याचे एसीसीने न्यायालयाला सांगितले आहे.
शेख हसीना, त्यांची कन्या साइमा वाजेद पुतुल, भगिनी शेख रेहाना, ब्रिटीश खासदार तुलिप रिझवाना सिद्दीक, रेहाना यांचे पुत्र राडवान मुजीब सिद्दीक आणि ४८ जणांविरोधात अधिकारांचा गैरवापर करून भूखंडबेकायदेशीरपणे मिळवल्या प्रकरणी अटक वॉरंट बजावले आहे.





