बांग्लादेशमध्ये पुन्हा सत्तापालट होणार? लष्करप्रमुखांनी बोलवली महत्त्वाची बैठक, राजधानीत सैन्य तैनात

Bangladesh Political Crisis | बांग्लादेशमध्ये पुन्हा एकदा राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. देशाची राजधानी ढाका आणि इतर भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात करण्यात आले आहे. यामुळे मोहम्मद युनूस यांच्या सरकारविरुद्ध लष्कराकडून बंडखोरी केली जाणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
बांगलादेशमध्ये पुन्हा सत्तापालट होणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. मात्र, यासंदर्भात हंगामी सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस व लष्करप्रमुख वकार-उज-जमा यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यातच लष्करप्रमुखांद्वारे आपतकालीन बैठक बोलवण्यात आली. बांग्लादेशमध्ये यापूर्वीही अनेकदा लष्करी उठाव झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा तशीच स्थिती निर्माण होणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
लष्करप्रमुख या सर्व घटनाक्रमांच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांच्यावर सत्ता आपल्या हातात घेण्याचा दबाव वाढला असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, त्यांनी देशात दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता देखील व्यक्त केली.
एकीकडे देशातील अनेक विद्यार्थी संघटना मोहम्मद यूनुस सरकारविरोधात आंदोलन करत असताना त्यांनी दहशतवादी हल्ल्याची शक्यता व्यक्त केली. बांग्लादेशमध्ये लष्करी राजवट अथवा आणीबाणी लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सैन्य, सरकार आणि विद्यार्थी संघटनांमधील वाढत असलेल्या तणावामुळे या चर्चा सुरू झाल्या आहेत.
पुढील काही दिवसात मोहम्मद यूनुस चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. बांगलादेशच्या दृष्टीने ही दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र, या दौऱ्याआधीच सत्तापालटाच्या चर्चांना वेग आला आहे.





