‘शेख हसीना यांच्या पक्षाचे पुनरुज्जीवन करण्यात सैन्याचा हात’, विद्यार्थ्यांच्या पार्टीच्या आरोपावर लष्कराने दिले उत्तर

ढाका – बांगलादेशातील लष्कराने राजकारणातील हस्तक्षेपाचा आरोप फेटाळला आहे. नव्याने स्थापन झालेल्या विद्यार्थ्यांच्या नॅशनल सिटीझन्स पार्टीने पंतप्रधानपदावरून हटवण्यात आलेल्या शेख हसीना यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी बांगलादेश लष्कर प्रयत्नशील असल्याचा आरोप केला होता. आवामी लीग पक्षाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी लष्कराच्या पाठिंब्याने कट केला जात असल्याचे सांगून या कटाच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांच्या पक्षाने ढाका विद्यापीठामध्ये निदर्शने केली होती.
मात्र लष्कराने स्वीडनमधील नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत हा आरोप फेटाळून लावला आहे. हा आरोप म्हणजे अत्यंत अपरिपक्वपणे केलेला काल्पनिक दावा असल्याचे म्हटले आहे. लष्कर प्रमुख जनरल वकार उझ झमान यांनी ११ मार्च रोजी एनसीपीच्या दोन विद्यार्थी नेत्यांची भेट घेतली होती आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चाही केली होती, असेही लष्कराच्या निवेदनात म्हटले आहे.
विद्यार्थ्यांच्या संघटनेने गेल्या महिन्यात नॅसनल सिटीझन्स पार्टी नावाने नवीन राजकीय पक्ष स्थापन केल्यापासून हा पक्ष लष्करावर राजकारणात हस्तक्षेप करण्याचा आरोप करत आहे. शनिवारी ढाका विद्यापीठात झालेल्या निदर्शनांमध्ये शेकडो विद्यार्थी कार्यकर्ते सहभागी झाले होते. हसीना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना फाशी देण्याच्या मागणीच्या घोषणा यावेळी करण्यात आल्या.
विद्यार्थ्यांकडून वारंवार आरोप होत असतानाही लष्कराने आपला संयम सोडला नसून काही वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावरून हा दावा खोडून काढण्याचा प्रयत्नही केला आहे.
गेल्या वर्षी ५ ऑगस्टला शेख हसीना बांगलादेशातून बारताच्या आश्रयाला आल्या. त्यांच्या आवामी लीग पक्षाच्या बहुतेक वरिष्ठ नेत्यांना अटक झाली असून त्यांच्यावर सामूहिक हत्येच्या आरोपाखाली खटले दाखल झाले आहेत.





